धक्कादायक:अपहरण झालेल्या युवा नेतृत्व सरपंच संतोष देशमुख यांचा काही तासांनी आढळला मृतदेह !
केज : केज तालुक्यातील मस्साजोग येथील युवा नेतृत्व व माजी सरपंच पती संतोष देशमुख यांचे काही अज्ञाताने दुपारी अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही तासानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने खळबळ उडाली असून कर्तृत्वान युवा कार्यकर्ता गेल्याने मस्साजोग व तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र काही तासानंतर बोरगाव - दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित आहेत.त्यांनी मस्साजोग ग्रामपंचायत ला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमका हा प्रकार कसा व का घडला याचा तपास केज पोलीस करत आहेत.
भर दुपारी अपहरण करून खून
भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला असल्याने केज तालुक्यात खळबळ माजली आहे.मस्साजोग चे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे दिनांक ९ डिसेंबर रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडी क्र.(एम एच ४५/बी ३०३२) मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी शिवराज देशमुख हे गाडी चालवीत होते. ते केज येथुन मस्साजोगकडे जात असतांना डोणगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोलनाक्या जवळ एका काळ्या रंगाची स्कार्पिओ आडवी लावली. त्या गाडीतुन सहा इसम खाली उतरले. त्यातील एकाने दरवाज्याची काच दगडाने फोडुन गाडीत पाहिले व दुसऱ्या डाव्या साईडच्या बाजुला जावुन सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली. अपहरणकर्त्यानी त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाची स्कार्पिओमध्ये त्यांना बळजबरीने बसवुन केजच्या दिशेने भरधाव वेगात निघुन गेले. अपहरण केल्या नंतर अपहरण झल्याची माहीती पोलिसांना मिळताच तातडीने दोन पोलीस पथके तपासाठी रवाना करण्यात आली होती. पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूरघाट रस्त्यावर दहीटना फाटा येथे मिळून आला. मयताच्या अंगावर मारहाणीचे व शास्त्राचे वार आहेत. पोलीसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणला आहे.
जमाव आक्रमक
घटनेची माहिती मिळताच मस्साजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले आहेत. आरोपी ताब्यात घेई पर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची चर्चा सुरू आहे. पोलीसांनी जादा कुमक मागवीली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा