परभणी: आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे यांचं निधन 


परभणी,(प्रतिनिधी) :  भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे यांचे सोमवारी (दि.16) रात्री र्‍हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होते. या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

              येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड करीत संविधानाचा अवमान केल्याची घटना 10 डिसेंबर रोजी घडली. घटना घडल्या बरोबर ज्येष्ठ नेते वाकोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथील स्फोटक परिस्थिती तात्काळ ओळखून  तातडीने अत्यंत संयमाची भूमिका घेतली. दुसर्‍या दिवशीसुद्धा या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या आंदोलनात दरम्यान वाकोडे यांनी संपूर्ण बंद शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. अति उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस दलाने ठिकठिकाणी केलेल्या बळाच्या वापराबद्दल तसेच गेल्या दोन दिवसात पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांच्या मारहाणीत कारागृहात मृत्युमुखी पडलेल्या सूर्यवंशी या युवकाच्या निधनानंतर वाकोडे यांनी आक्रमक भूमिका घेवून मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरला करावे, अशी मागणी केली होती. तसेच आज सोमवारी दिवसभर पुकारलेल्या राजव्यापी बंदच्या दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात ठाण मांडून वाकोडे यांनी या घटनेत न्यायालयनीय चौकशी करावी अशी मागणी केली. 

 सायंकाळी 6.30 वाजता सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीत यात्रेत तसेच अंत्यसंस्कारात सहभाग नोंदवून ते घरी परतत असतांना  प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने  कार्यकर्त्याच्या मदतीने वाकोडे यांनी एका खाजगी रुग्णालयात धाव घेतली, परंतु उपचार सुरू असतांनाच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दरम्यान, वाकोडे यांच्या निधनाच्या वृत्ताने आंबेडकरी चळवळीसह सर्व क्षेत्रातील नागरीकांना मोठा धक्का बसला आहे.


परिवर्तनवादी चळवळीतील शिलेदार


गेल्या चार दशकांपासून आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणून विजय वाकोडे संपूर्ण मराठवाडाच नव्हे तर मराठवाड्याबाहेरही परिचित होते. पॅंथरच्या चळवळीतून धारदार असे नेतृत्व म्हणून ते पुढे आले. त्याकाळी सामाजिक विषमतेच्या सर्व आंदोलनांमध्ये ते सहभागी होते. दलित पॅंथरनंतर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक लढ्याचे कार्य चालू ठेवले. लोकनेते या नावाने ते सार्वजनिक जीवनात परिचित होते तर प्रेमाने 'बाबा' हे संबोधन त्यांना मिळाले होते. आज सोमवारी परभणीतील पार पडलेल्या निदर्शने व आंदोलनात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सायंकाळनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीतील एक शिलेदार हरवला आहे.

           मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, गेल्या आठवड्यात  आजारातून बरे झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात सक्रीय झाले होते. परभणीतील संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणानंतर पुकारलेल्या बंद आंदोलनाचे नेतृत्व त्यांनीच केले होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार