भाविकांनी लाॅकरचा उपयोग करावा
मंदिर अलर्ट : वैद्यनाथ मंदिर परिसरातील बॅग चोराला अर्ध्या तासात पकडले!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत असतात. मंदिर व परिसरात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक ती सर्व व्यवस्था लावण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकीही नेमण्यात आलेली आहे. परंतु तरीही या परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न अनेक वेळा होतो. मात्र या ठिकाणची पोलीस चौकी व मंदिर अलर्ट असल्याने गुन्हेगारांना व चोरट्यांना या ठिकाणी यश प्राप्त होत नाही.
अशाच प्रकारची एक घटना आज (दि.१८) सकाळीच बघायला मिळाली. नांदेड जिल्ह्यातील दोन महाविद्यालयीन तरुणी परीक्षेसाठी परळी येथे आल्या होत्या. परीक्षेला जाण्यापूर्वी वैद्यनाथ मंदिरात त्या दर्शनासाठी आल्या मात्र त्यांनी आपल्या बॅगा लॉकरमध्ये न ठेवता मंदिर परिसरात बाहेरच एका दुकानासमोर ठेवल्या. ही संधी साधून गंगाखेड येथील रहिवासी असलेल्या एका भुरट्या चोर तरुणाने या बॅगा पळवण्याचा प्रयत्न केला. या युवती दर्शन घेऊन आल्यानंतर तात्काळ पोलीस चौकीत जाऊन ही बाब सांगितली. यावर तातडीने कारवाई करत पोलीस चौकीचे पो.उपनि. राजाभाऊ शेळके यांनी सीसीटीव्ही चेक करत तात्काळ या चोरट्याचा तपास केला. त्याचा पाठलाग करत मंदिर परिसरात बॅगांसह या चोराला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चोरलेल्या बॅगा संबंधित युवतींना सहीसलामत वापस दिल्या. या चोरट्याला पोलीस ठाण्यात हजर केले.
भाविकांनी लाॅकरचा उपयोग करावा
दरम्यान, मंदिर परिसरात नेहमीच वर्दळ असते. मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात आपल्या बॅगा, मोबाईल व किमती सामान, साहित्य ठेवण्यासाठी लाॅकरची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र तरीही काही भाविक लाॅकरचा उपयोग न करता मंदिर परिसरात इतरत्र आपले सामान ठेवतात. त्यामुळे अशा घटना घडू शकतात. परंतु भाविकांनी लाॅकर च्या सुविधेचा उपयोग करावा व आपले साहित्य बॅगा, सामान लाॅकरमध्येच ठेवावे असे आवाहन वैद्यनाथ मंदिर प्रशासनाने केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा