समाधीस्थळी 'आशिर्वादाची' पुष्पपुजा !!!!!
मुंडे बंधु -भगिनीचा मंत्री म्हणून होणार शपथविधी: गोपीनाथगडावरुन 'आशिर्वाद' ! समाधीस्थळी 'आशिर्वादाची' पुष्पपुजा
![]() |
(पुष्पसजावट:विठ्ठल मुंडे,गोपीनाथगड) |
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
नागपूर येथे आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून या मंत्रिमंडळात ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण म्हणजे मुंडे बहीण भाऊ कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून तर पंकजा मुंडे भाजप कडून मंत्रीपदी विराजमान होत आहेत. चार वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी गोपीनाथ गडावर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळावरून 'आशिर्वाद' अशी पुष्प सजावट करून समाधीची पूजा करण्यात आली आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवणाऱ्या भाजपा राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे या पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सकाळीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन करून त्यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी निरोप दिला. पंकजा मुंडे यांना अधिकृतपणे पक्षाकडून मंत्री पदाचे निमंत्रण मिळाल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात आनंद साजरा करण्यात आला. त्याचबरोबर दुग्धशर्करा योग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कडून पंकजाताई मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांचीही मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली. संपूर्ण बीड जिल्ह्यात हा सुवर्णयोग मानल्या जात असून परळी मतदारसंघाला दोन मंत्री पदाच्या रूपाने ऐतिहासिक क्षणाचे भाग्य मिळाले आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या माध्यमातून पुढे आलेल्या व राज्यस्तरावर आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उगवणाऱ्या या मुंडे बंधू भगिनींच्या मंत्रिपद शपथविधीला त्यांना गोपीनाथ गडाचे आशीर्वाद असल्याचा संदेश देत गोपीनाथ गडावर आजची विशेष पुष्प पूजा करण्यात आली आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी आकर्षक अशी पुष्प सजावट करण्यात आली असुन फुलांनी 'आशिर्वाद' अशी श्रृंगार पूजा मांडण्यात आली आहे. एक प्रकारे मंत्री होणाऱ्या या बहिण- भावांना गोपीनाथ गड 'आशिर्वाद' प्रदान करत असल्याचा यातून संदेश देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा