नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे पुरातन वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांची तोडफोड
पायऱ्या पूर्ववत कराव्यात : अश्विन मोगरकर
परळी वैजनाथ
नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत होणाऱ्या कामात पुरातन वैद्यनाथ मंदिराच्या दक्षिण पायऱ्याचे होणारे पाडकाम त्वरित बंद करावे, व पायऱ्या पूर्ववत कराव्यात अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरासाठी व भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र सरकारने 2019 साली तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून 133 कोटी 58 लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करून आणला होता. या योजनेअंतर्गत मंदिराच्या पुर्वेस हरिहर तिर्थाजवळ दर्शन मंडप,दक्षिणमुखी गणेश मंदिराच्या पाठिमागे 40 खोल्यांचे यात्री निवास,शनि मंदिराच्या पाठिमागे 20 खोल्यांचे यात्री निवास,मेरुगिरी पर्वतावर 8 खोल्यांचे कॉटेजेस व उपहारगृह,उद्यान विकसित करणे,वैद्यनाथ मंदिर भोवताली दगडी फरशी बसवणे,नगरपालिकेजवळ वास्तुशिल्प प्रवेशद्वार बांधणे,मेरुगिरी पर्वताभोवती सिमेंट कॉंक्रीटचा प्रदक्षिणा मार्ग करणे,वैद्यनाथ मंदिराच्या पुर्वेकडील वाहनतळ विकसित करणे,हरिहर तिर्थाभोवती उद्यान विकसित करणे,दक्षिणमुखी गणेश मंदिराजवळ 150 व्यक्ती बसु शकतील असा सभामंडप बांधणे तसेच शहरात विविध ठिकाणी सौंदर्यीकरण व विकासकामे होणार होती. पुढे 2023 मध्ये महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी या योजनेत बदल करीत 286 कोटी रुपयांचा वाढीव आराखडा मंजूर केला.
या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंदिराच्या पूर्व भागात प्रति वैद्यनाथ मंदिराजवळ दर्शन मंडप बांधण्याचे काम सुरू आहे.या इमारती जवळ असलेल्या दक्षिण व पूर्व बाजूस असलेल्या काही पायऱ्या ही इमारत बांधताना गुत्तेदाराने चक्क काढून टाकल्या आहेत. या योजनेत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेवर संपूर्ण लक्ष व नियंत्रण ठेवण्याचे काम परळी नगरपरिषदेकडे आहे. या योजनेच्या उद्घाटन करतेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तीर्थक्षेत्र विकास योजनेत होणाऱ्या कामामुळे मूळ मंदिराच्या रचनेत कुठल्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचे सांगितले होते. तसेच या तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या वर्कऑर्डर मध्ये मंदिराच्या संरचनेत कुठलाही बदल न करण्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. परंतु नगरपरिषदेच्या प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत गुत्तेदारास मोकळे रान दिल्याने दक्षिण दिशेकडे असलेल्या पुरातन पायऱ्या काढून टाकल्या आहेत. शेकडो वर्षांपूर्वीच्या पूर्व पायऱ्याचा काही भाग तर दक्षिण भागातील पूर्ण पायऱ्या पैसे वाचवण्यासाठी सदरील गुत्तेदाराने तोडून तिथून बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी रस्ता बनवला.
पुरातन ज्योतिर्लिंगवैद्यनाथ मंदिराच्या दक्षिण व पूर्व पायऱ्या पडण्याचे त्वरित थांबवावे व तोडलेल्या पायऱ्या त्वरित पूर्ववत करावे. तसेच मंदिराच्या पूर्वेकडील प्रतिवैद्यनाथ मंदिराजवळील पुरातन चिंचेचे महाकाय झाड कोणत्याहि परिस्थितीत तोडले जाऊ नये या मागणीचे निवेदन बुधवार, 1 जानेवारी रोजी अश्विन मोगरकर यांनी परळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांना दिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा