दिवसभरात काय काय घडलं ?

 परळीत वाल्मीक कराड समर्थकांकडून परळीत दिवसभर आंदोलन  !

● माझ्या मुलाला न्याय द्या- वाल्मीक कराड यांच्या आईचा परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या 

● टाॅवरवर चढून, पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचाही काही जणांचा प्रयत्न

● टायर जाळले,रास्ता रोको,  बसवर दगडफेकीच्या घटना

● परळी शहर क्षणातच बंद


परळी वैजनाथ , प्रतिनिधी...

     मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे.याअनुषंगाने आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मीक कराड यांच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या आईने परळी पोलीस ठाण्यात ठिय्या सुरू केला आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या व माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या 75 वर्षीय पारुबाई बाबुराव कराड या आईने सकाळपासून परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला.

       वाल्मीक कराड यांच्या आईने शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिल्यानंतर  पोलीस ठाण्यासमोर हजारोच्या संख्येने जमाव जमा झाला.परळीच्या मध्यवर्ती असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर वर चढून वाल्मीक कराड समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. तर शहरात विविध ठिकाणी चौकाचौकात जमा होत नागरिक घोषणाबाजी करत या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने समर्थक रस्त्यावर उतरल्याचे दिसुन आले.

वाल्मीक कराड समर्थकांनी टायर पेटवत केली प्रचंड घोषणाबाजी

      खंडणी प्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्या आईने सकाळपासून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.त्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समर्थनार्थ कराड समर्थक रस्त्यावर उतरले.परळी शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावरवर चढून कराड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यानंतर मोठ्या संख्येने कराड समर्थक पोलीस ठाण्यासमोरही जमा झाले. शहराच्या विविध चौकामध्ये कराड समर्थक जमा होत जोरदार घोषणाबाजी करत वाल्मीक कराड यांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी करून घोषणाबाजी करताना दिसून आले. या अनुषंगानेच राणी लक्ष्मीबाई टावर चौकातील आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत या ठिकाणी टायर जाळून घोषणाबाजी केली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी  पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौकात पोलिसांनी मध्यस्थी करत आक्रमक झालेल्या कराड समर्थकांना शांत केले.या ठिकाणी जाळण्यात आलेले टायरही विझवून टाकण्यात आले.

समर्थक आक्रमक: मनोज जरांगे,सुरेश धस,अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड व संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमांना मारले जोडे

       मस्साजोग खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या आईने सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरल्यानंतर या ठिय्या आंदोलनाच्या समर्थनात परळी व तालुक्यातील विविध गावातून कराड समर्थक मोठ्या संख्येने परळी शहरात दाखल झाले.पोलीस ठाण्यासमोर कराड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला. या ठिकाणची गर्दी सातत्याने वाढताना दिसत होती.  मोठ्या संख्येने महिलाही या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्या. तर दुसरीकडे शहरातील विविध चौकांमध्येही कराड समर्थक जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक आंदोलन करताना दिसले. पोलीस ठाण्यासमोर जमा झालेल्या कराड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलन स्थळी सहभागी कराड समर्थक महिलांनी आमदार सुरेश धस,अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा देत त्यांच्या प्रतिमांना चपला मारून जोडे मारो आंदोलन केले. 

परळी- बीड रस्त्यावर रास्ता रोको

         वाल्मीक कराड यांच्या पांगरी गावातील त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.टायर जाळत परळी- बीड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

महिला कार्यकर्तीने केला आत्मदहनाचा प्रयत्न

दरम्यान, पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरू असताना या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. या अनुषंगानेच आंदोलनात सहभागी असलेल्या एका महिलेने अंगावर तेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित अन्य आंदोलनकर्ते व पोलिसांनी आत्मदहन करण्यापासून तिला परावृत्त केले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष वर्षा दहिफळे असे या आत्मदहन प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्तीचे नाव आहे.

कराड समर्थक आक्रमक :अचानक काही क्षणातच परळी शहर बंद !

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ परळीत सकाळपासूनच त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. वाल्मीक कराड यांच्या आई पारुबाई कराड यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला होता. या आंदोलनाच्या समर्थनार्थ शेकडो समर्थक पोलिस ठाण्यात जमा झाले होते. या अनुषंगानेच शहरात विविध ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलने केली जात होती. एका बाजूला केज न्यायालयात वाल्मीक कराड यांना हजर केले जात असताना परळीत मात्र त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत विविध प्रकारची आंदोलने केली.पोलिसांची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी तारांबळ होत असल्याचे सकाळपासूनच दिसून आले.  परळी शहरात बाजारपेठेमध्ये जोरदार घोषणाबाजी करत मोटरसायकल वरून कराड समर्थक बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करताना दिसून आले.काही क्षणातच परळीची बाजारपेठ कडकडीत बंद झाली. पोलिसांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावला असला तरी परळी शहरात काहीसे तणावाचे  वातावरण निर्माण झालेले आहे.  

परळी बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसफेर्या  बंद करण्याचा निर्णय !

         खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड समर्थक परळीत आक्रमक झाल्याचे सकाळपासून दिसून येत आहे. या अनुषंगाने काहीसे  तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने परळी बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेस रद्द केल्या.  याबाबत आगार प्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बसेसची तोडफोड होऊ नये या दृष्टिकोनातून काही वेळासाठी बस बंद करण्यात आल्या होत्या. दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत बीड मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र काही वेळापूर्वीच बस सुरू केल्या होत्या. परंतु परळी बंद व ठीकठिकाणी होणारे रस्ता रोको आदीच्या वृत्ताच्या अनुषंगाने वरिष्ठांनी परळी आगारातून बस सेवा बंद ठेवण्याबाबत सूचना केल्या. त्या अनुषंगाने परळीतून सुटणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

परळी -कौडगाव कानडी बसवर दगडफेक!

       परळी- कौडगाव कानडी या बसवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना घडली.परळी तालुक्यात काही ठिकाणी रस्ता रोकोचाही प्रकार समोर आला. त्यानंतर एसटी महामंडळाने बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. परळी- कौडगाव कानडी या बसवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटनाही पुढे आली .

परळीत ठिय्या सुरुच: वाल्मीक कराड यांच्या आईची प्रकृती बिघडली ;दवाखाण्यात जाण्यास नकार

        मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे.याअनुषंगाने आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मीक कराड यांच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या आईने परळी पोलीस ठाण्यात ठिय्या सुरू केला आहे. वाल्मीक कराड समर्थकांकडून परळीत दिवसभर आंदोलन सुरुच आहे.वाल्मीक कराड यांच्या आईची प्रकृती बिघडली आहे. दवाखाण्यात जाण्यास त्यांनी नकार दिला आहे.

           दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या व माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या 75 वर्षीय पारुबाई बाबुराव कराड या आईने सकाळपासून परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला. दिवसभर कराड समर्थकांकडून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमिकाही आंदोलकांनी घेतली आहे.या दरम्यान आंदोलनकर्त्या वाल्मीक कराड यांच्या आई पारूबाई कराड यांची तब्येत अचानक बिघडली असुन त्यांनी उपचार घेण्यासाठी दवाखान्यात दाखल होण्यासही नकार दिला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला मात्र आपण या आंदोलनस्थळ सोडून जागेवरून हलणारही नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे जागेवरच डॉक्टरांची टीम पाचरण करून त्यांना पोलीस ठाण्यासमोरच उपचार देण्यात आले आहेत. आपले आंदोलन सुरूच ठेवणार असून खोटे गुन्हे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

वाल्मीक कराड समर्थक एका कार्यकर्त्यांने घेतले पेटूवून तर एकाला हृदयविकाराचा झटका

       आज दिवसभरात वाल्मीक कराड यांच्या समर्थकांनी परळीत आंदोलने सुरू केली असून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला आहे. यावेळी अनेक जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. अद्यापही पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू असुन या आंदोलन स्थळावर एका कार्यकर्त्याने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यात या कार्यकर्त्याला पायाला थोडेसे भाजले आहे. तात्काळ त्यास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पेटवून घेतलेल्या कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्याची लगबग सुरू असतानाच उपस्थितांसमोर आपली भावना व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याला हृदयात कळ येऊ लागली व तो अस्वस्थ होऊन चक्कर येऊन खाली कोसळला. त्यालाही उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पेटवून घेणाऱ्या कराड समर्थकाचे नाव दत्ता जाधव  असे असल्याचे समजते. तर हृदयविकाराचा त्रास झालेला कराड समर्थक हा परळीतील येथील एजाज शेख नावाचा कार्यकर्ता आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात व पोलीस ठाण्यासमोर कराड समर्थकांची मोठी गर्दी झाली असुन जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू होती.

परळी पोलीस ठाण्यासमोरील कराड समर्थकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित !

      परळी पोलीस ठाण्यासमोरील वाल्मीक कराड समर्थकांचे आंदोलन रात्री ९ वा सुमारास तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी आंदोलनाला भेट देवून निवेदन स्वीकारले आहे.

   वाल्मीक कराड समर्थकांकडून परळीत दिवसभर आंदोलन सुरुच होते.रात्री ९ वा सुमारास हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले जाणार आहे. त्या संदर्भातली अगोदर बैठक घेऊ आणि आंदोलनाची दिशा ठरवू असे सांगण्यात आले आहे. मात्र परळी बेमुदत बंदची हाक यावेळी देण्यात आलेली आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत परळी बंद ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे.उद्या सकाळी दहा वाजता ची मिटिंग झाल्यानंतर बीड जिल्हा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला .आंदोलकांच्या वतीने कायदेशीर तपासाबाबत जे काही निवेदन देण्यात आलेले आहे त्या निवेदनाचा स्वीकार करून आपण ते शासनापर्यंत पाठवू अशा प्रकारचे आश्वासन आंदोलकांना त आपण दिले आहे. कायद्याच्या अखत्यारीत राहूनच सर्व काही तपास केला जाईल. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काळजी घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी चेतना तिडके यांनी केले.












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार