या 'ड्रीम'ची दरोड्यात ख्याती; महाराष्ट्रासह अन्य राज्यातही केले अनेक गुन्हे

सिग्नल बंद पाडून रेल्वेत टाकायचे दरोडे : रेल्वे पोलीसांनी सराईत तीन आरोपींसह एका सराफा व्यापाऱ्याला केलं जेरबंद

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी सिग्नल बंद पाडून रेल्वेत घुसून दरोड्याच्या घटनांमध्ये आवश्यक असलेल्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यात परळी रेल्वे पोलिसांना यश मिळाले आहे. सराईत असलेल्या तीन दरोडेखोरांसह भूम येथील एका सराफा व्यापाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये परळी वैजनाथ रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन  व नांदेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा रेल्वेतील  दरोडेच्या तीन घटना घडल्या होत्या. या घटनांतील मुद्देमाल व रेल्वेत दरोडे टाकणारी सराईत टोळीच या निमित्ताने पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश मिळाले आहे.

    ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024 या महिन्यांमध्ये परळी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन दरोडय़ाच्या व काही चोरीच्या संदर्भात गुन्हे घडले होते.तसेच नांदेड रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचा गुन्हा घडला होता.  त्यामध्ये आरोपी हे रेल्वेमार्गावर सिग्नल तोडून, बंद पाडून (सिग्नल टेम्परिंग)  रेल्वे गाडी थांबल्यानंतर रेल्वे डब्यात घुसून ते प्रवाशांची लूटमार करत होते. यामध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होते. आरोपींनी सलग  हे  दोन-तीन गुन्हे केल्यामुळे त्यांना पकडणे हे रेल्वे पोलिसांसमोर आव्हान होते.  त्या संदर्भात रेल्वे पोलीस विभाग छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संजय लोहकरे यांनी तपासासाठी पथक नियुक्त केले होते.रेल्वे पोलीसचे एलसीबी पथक व परळी वैजनाथ रेल्वे पोलीस ठाण्याचे एक पथक यांनी समांतर तपास करीत या आरोपींचा शोध घेऊन  त्यांना जेरबंद केले आहे. 

         अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अविनाश उर्फ ड्रीम काळे, सतीश उर्फ रवि भोसले,अजित सांगळे यांचा समावेश आहे.तर चौथा आरोपी म्हणून भूम जि.धाराशिव येथील  सराफा व्यापारी दिगंबर चंद्रकांत धर्माधिकारी यास अगोदरच अटक करण्यात आलेली आहे. स्था.गु.शा.स.पो.नि. प्रशांत गंभीरराव, परळी रेल्वे पोलीस ठाण्याचे स.पो.नि. सोमनाथ वाघमोडे, पो. हवालदार संजय भेंडेकर, अनंत कांबळे, कोंडीराम सातपुते, नितीन गवळी. गजानन टीमकीकर आदींनी ही कामगिरी केली आहे.

परळीजवळ या रेल्वेगाड्यांवर झाले होते दरोडे

      ऑक्टोबर महिन्यामध्ये परळी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव स्टेशन जवळ सिग्नल तोडून कोल्हापूर - नागपूर या रेल्वेगाडीत चोरट्यांनी घुसून महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने पळवले होते. तर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या  घटनेत सिग्नल तोडून पानगाव स्टेशन जवळ रेल्वेत घुसून त्याच पद्धतीने एका महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने पळविण्यात आलेले होते. अशाच प्रकारची घटना नांदेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घडली होती. या दोन घटनांच्या गुन्ह्याच्या तपासात हे आरोपी अटक करण्यात आले असून या आरोपींकडून अन्य ठिकाणी रेल्वेवर अशाच पद्धतीने झालेल्या दरोडाच्या घटनाही उघडकीस होण्यास मदत होणार आहे.

या 'ड्रीम'ची दरोड्यात ख्याती; महाराष्ट्रासह अन्य राज्यातही केले अनेक गुन्हे

  रेल्वे पोलिसांकडून चार आरोपी अटक करण्यात आले आहेत. यामधील अविनाश उर्फ ड्रीम काळे हा मुख्य आरोपी आहे. त्याने बाहेरच्या राज्यातसुद्धा असे अनेक गुन्हे केलेले आहेत.हा सराईत गुन्हेगार इतर राज्यांनाही पाहिजे आहे. त्यामुळे रेल्वेत दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अटक केल्यामुळे रेल्वेमार्गावर घडणाऱ्या महाराष्ट्र, तेलंगणा राज्य आदी ठिकाणचे गुन्हे उघडकीस  आणण्यात यश मिळणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार