केज पोलिसांची गुटख्यावर धाड :३२ हजाराचा मुद्देमाल जप्त : दोघे पोलिसांच्या ताब्यात
केज :- पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे यांच्या पथकाने केभ कळंब रोड नजीकच्या शेतात साठवून ठेवलेल्या गुटख्यावर धाड घालून ३२ हजार रु किमतीच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दिनांक ११ जानेवारी रोजी केज पोलीसांना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, केज ते कळंब जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-सी लगत शेतामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा दोन इसमांनी विक्री करिता साठवून ठेवलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज यान ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना कळवून त्यांच्या आदेशा वरून व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मुंडे यांच्या पथकाने सदर ठिकाणी दि. ११ जानेवारी रोजी दुपारी १२:४५ वाजता छापा मारला.
त्यावेळी पोलिसांना केज-कळंब महामार्ग क्र. ५४८-सी वरील एच पी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दळवी यांचे शेतात, अहिल्यादेवी नगर केज येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा ताब्यात बाळगलेले शाकीर इकबाल कुरेशी आणि राहुल दादासाहेब लांडगे हे.दोघे त्यांच्या ताब्यातील प्रतिबंधित केलेला गुटखा राजनिवास, विमल या तंबाखूजन्य पदर्थासह आढळून आले. त्या दोघांनाही त्यांच्या ताब्यातील ३२ हजार १०० रू. च्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्या दोघा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १७/२०२५ भा. न्या. सं. १२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा