परळीच्या माजी नगराध्यक्षाची फेसबुक पोस्ट प्रचंड चर्चेत !

परळीच्या बेसुमार, बेमालूम बदनामीचा 'असुरी आनंद' घेणारांनो, परळीवरचे हे जखमांचे व्रण मिटणार नाहीत !

परळीच्या माजी नगराध्यक्षाची फेसबुक पोस्ट प्रचंड चर्चेत 


काय म्हणता? परळीत एक वर्षात 109 खून..बापरे!आम्हाला तर माहीतच नाही...!!


दमडीच तेल आणलं, 

सासूबाईचं न्हाण झालं 

मामंजीची दाढी झाली,

भावोजींची शेंडी झाली.


उरलेले तेल झाकून ठेवलं,

लांडोरीचा पाय लागला

वेशीपर्यंत ओघळ गेला 

त्यात उंट वाहून गेला.


मराठी व्याकरणातील 'अतिशोक्ती अलंकार' हा कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते त्यावेळी  होतो.


आमच्या परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राबाबत सध्या हाच प्रयोग सर्वांकरवी बेसुमार, बेमालूम अव्याहतपणे सुरु आहे.


कर्तृत्ववान युवा सरपंच स्व.संतोषअण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या झाली.संतोष अण्णांची लेकरं पोरकी झाली...चिमुकल्यांना बघून अवघा महाराष्ट्र हळहळला....या नीच दहशतवादी प्रवृत्तीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत गप्प बसले नाही पाहिजे...पण आता एकंदरीत विविध माध्यमांच्या बातम्या बघता मुख्य लक्ष भरकटते आहे असे वाटतं नाही का?


परळीची बदनामी करताना कधी आम्ही 'गँग्ज ऑफ वासेपूर' असतो...कधी आम्ही 'हमास' होतो..आमच्यातूनच 'पुष्पा' निघतो...आणि आज तर बोलण्यात कहरच केला...परळीत वर्षात 109 खून होतात म्हणे...चक्क प्रेत सापडतात म्हणे हो... कुठून माहिती मिळते तुम्हाला? 


रंजक म्हणजे किती अतीवरंजक वर्णन करणार हो परळीचे? चक्क वर्षात 109 खून..म्हणजे सरासरी तीन दिवसाला 1 खून..ना कुठला गुन्हा..ना पोलिस डायरीत नोंद..ना पोस्टमार्टम रिपोर्ट..ना प्रेतांसाठी नातेवाईकांनी केलेला क्लेम...शक्य आहे का या युगात?


संबंधित सगळी व्यवस्था आणि यंत्रणा मॅनेज असेल असे समजू बरं का? बरं मग शेवटी बेवारस प्रेतांचा अंत्यविधी तर परळी नगर परिषदेलाच करावा लागत असेल ना? आमच्या नगर पालिकेत बेवारस प्रेतांचे अंत्यविधी करण्यासाठी आकस्मात निधीची तरतूद केली गेलेली आहे...तिथे तरी आकस्मात खर्च रजिस्टरला नोंदी सापडतील ना...नोंद नसेल तर तिथे स्मशानभूमीत रजिस्ट्ररला नोंदी असतील ना..कुठेतरी नोंद असेल ना? 


बरं आमचे परळीचे सर्व 'रीलस्टार' का झोपले होते का मग? का एक पण प्रेताचा VDO नाही? तुम्हालाच कसे कळले? आकाशवाणी झाली का तुमच्या गांवात? का ही मेलेली माणसं आली तुमच्या स्वप्नात? कळू द्या आम्हाला....परली की जनता ये जानना चाहती है!


परळी हे दक्षिण मध्य रेल्वेचे मोठे रेल्वे 'जंक्शन' असल्याने देशभरातून अनेक बेवारस लोक परळीत येतात...वैद्यनाथ मंदिर आणि रेल्वे स्थानक परिसर येथे भिक मागतात..ईथेचं राहतात आणि अनेकांचा शेवट इथेच होतो..यात अनेकजण मानसिक रुग्ण देखील असतात.. हे वास्तव आहे....यासाठी कुठले 'रॉकेट इंजिनियरिंग' अभ्यासावे लागणार नाही.अश्या बेवारस प्रेतांचा अंत्यविधी करणेसाठी नगर पालिकेने वेगळा निधी आणि यंत्रणा ऑलरेडी उभारलेली आहे.


काशीपेक्षा जवाभर 'पुण्यभू' असलेल्या आमच्या परळीचे महात्म्य अधिकचे आहे..परळीत आलेले 'मरण' थेट आम्हाला कैलासाला घेवून जाते ही आमची धारणा आहे...आमची चिताभूमी आहे असे आम्ही मानतो..ही आमची श्रद्धा आहे!


राजकारणी मंडळी आपापले स्कोअर सेट करण्यासाठी,प्रसार माध्यमे TRP साठी,अनेक समाजधुरीण महाराष्ट्रव्यापी नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहेत आणि कुंभमेळा ते कुंभमेळा प्रगटणारे सामाजिक कार्यकर्त्ये परळीच्या सवंग बदनामीत रॉकेल ओतायचे काम करत आहेत.


उद्या नेत्यांचे आपापसात मिटून जाईल,प्रसार माध्यमांना TRP साठी कदाचित वेगळी बातमी मिळेल,समाजधुरीणांना वेगळा मुद्दा आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पर्यटनासाठी दुसरा जिल्हा...पण शिल्लक राहिल स्व.संतोषभैय्या देशमुखांचा न्याय आणि परळीवर या काळात केलेल्या जखमांचे व्रण... 


देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारी आमची धन्वंतरी प्रभु वैद्यनाथांची नगरी,स्वतः ईश्वराने ज्यांच्यासाठी 'व्याघ्ररुप' धारण केले असे थोर संत जगमित्र नागांची 'जगमित्र भूमी'.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले आणि 'समुद्रमंथनात' देवांनी याच स्वयंभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंगात 'अमृत' लपवून ठेवले अशी आमची 'कांतीपुरी अमृतभूमी'.


आमच्या 'ऊर्जानगरीचे' महात्म्य वर्णन करण्यासाठी एक अख्खा दिवस पण कमी पडेल.आज आमची वैद्यनाथ नगरी पुन्हा एकदा 'हलाहल' प्राशन करण्यासाठी सिद्ध झाली आहे.या बदनामीतून बाहेर काढायला हलाहल पचवणारा साक्षात 'निळकंठ' सदैव आमच्या सोबत आहे हे निश्चित.


आज यासाठी बोलावेसे वाटले की महाराष्ट्र राज्यात फक्त परळीच आहे का? आमच्या गावच्या बदनामीमुळे परळीतील एका इन्स्टिट्यूटला प्रशिक्षणासाठी येणारे विद्यार्थी थांबले...आमच्या परळीच्या बाहेर जिल्ह्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे.. त्यांच्याकडे अपराधिक नजरेने बघितले जात आहे..आमच्या गावचा मोठा वर्ग उदरनिर्वाहासाठी बाहेर आहे.. त्यांना 'शंकेखोर' नजरेने बघितलं जात आहे...


आधीच विवाह समस्या अधिक असताना या बदनामीमुळे उद्या परळीतील मुलांचे लग्न जमणार नाहीत... परळीत कुणी मुलगी देणार नाही..व्यापार ठप्प होईल...तेंव्हा हे दुरोगामी परिणाम होवू नयेत म्हणून आता हे सर्व थांबवा... नेत्यांना,माध्यमांना सामाजिक कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे.


'Lawlesss Environment' बाबत फक्त परळीचीच चर्चा का होत आहे? कायदा सुवव्यवस्था अधिक बळकट होणे हे प्रत्येक गावासाठी जिल्ह्यासाठी गरजेचे आणि क्रमप्राप्त,न्यायिक अभिप्रेत आहेच..कायदा हा नेहमी उत्क्रांत असतो...सापडला तो चोर असतो.


परळीत राखेपासून वीटनिर्मिती आणि त्यातून उभारले गेलेले 'ब्रिक हब' हे हजारो कुटुंबांचे उपजीविकेचे साधन ठरले यामुळे याबाबत कठोर निर्णय घेता आले नसावेत.अटलजी भाषणात म्हणायचे 'हमारी निती गलत हो सकती है...लेकीनं नियत नहीं'.पण घेणं ना देण राखेमुळे हे लांच्छन लागत असेल आणि आरोग्यविषयक आणि पर्यावरण बाबत मोठ्या समस्या निर्माण झाल्या असतील तर आता याबाबत कठोर व्यवस्थापण करणे ही गरज आहे.


महाराष्ट्र राज्याला 'टाडा','मोक्का' सारखे कठोर कायदे देणारे आणि मुंबई शहर 'अंडरवर्ल्ड मुक्त' करीत राज्याचे आदर्श गृहमंत्री म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची ही कर्मभूमी आहे.


तात्कालीन प्रधानमंत्री भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रीय पीक विमा धोरणात अमूलाग्र बदल करायला प्रेरणा देणारे पीक विमा जनक ठरलेले कृषी महर्षी स्व.पंडितअण्णा मुंडे यांची जन्मभूमी परळी ही जन्मभूमी आहे.


धनुभाऊ आणि पंकजाताई ही दोन्ही नेतृत्व सक्षमपणे हा  वारसा पुढे घेवून जातील, परळीला आणि जिल्ह्याला अग्रेसर करतील हा विश्वास असून आलेले हे बदनामीचे काळे ढग लवकरच निघून जातील...आणि उंच भरारी घेण्यासाठी निरभ्र आकाश दिसेल मित्रांनो!!

▪️बाजीराव धर्माधिकारी ▪️

परळी वैजनाथ

-------------------------------------------------

( लेखक हे परळीचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष आहेत. परळी शहरातील विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर राहून काम करणारे व्यक्तीमत्व आहे.)

-------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार