विद्यार्थ्यांनी नेहमी अव्वलस्थानी राहण्याच्या ध्येयाने काम केले पाहिजे
संवेदनशील लेखक अरविंद जगताप यांचे प्रतिपादन
अंबाजोगाई: (वसुदेव शिंदे)
येथील योगेश्वरी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान यशस्वीपणे संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण व समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संवेदनशील लेखक,चला हवा येऊ या खळखळून हसवणाऱ्या कार्यक्रमातील ज्यांच्या संवेदनशील पत्रलेखनाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले असे मराठी चित्रपट पटकथा व संवाद लेखक मा. अरविंद जगताप यांना आमंत्रित करण्यात आले होते. अरविंद जगताप यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी नेहमी अव्वलस्थानी राहण्याच्या ध्येयाने काम केले पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रत्येकाने नेतृत्व करण्याची क्षमता स्वतः मध्ये विकसित केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी खरकटे होण्यात आपले आयुष्य घालवू नये आणि कोणाचीतरी चमचेगिरी करण्यात धन्यता मानु नहा असा संदेश दिला. त्यांनी चला हवा येवू द्या मधील "बाप"यावरील पत्र वाचून उपस्थितांना भावूक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव मा. कमलाकरराव चौसाळकर यांनी भुषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी योगेश्वरी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगून महाविद्यालयाच्या यशाची ही परंपरा आपण पुढे चालू ठेवावी व ती वाढवावी असे आवाहन करून सर्व विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष गणपत व्यास गुरुजी, कार्यकारी उपाध्यक्ष ॲड. जगदीश चौसाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्हि. कानेटकर, उपप्राचार्य डॉ. आर.व्ही. कुलकर्णी, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. अनिल नरसिंगे, आय. क्यू.ए. सी. समन्वयक डॉ.सचिन कळलावे, डॉ. महेंद्र आचार्य, विद्यार्थी प्रतिनिधी कु.ईश्वरी खाडे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्हि. कानेटकर यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाने गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल सादर केला.सूत्रसंचालन कु. श्रेया कोंडपल्ले व अक्षता मुळे या विद्यार्थिनींनी केले. आभार प्रदर्शन स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. अनिल नरसिंगे यांनी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजित युवा महोत्सवात शास्त्रीय नृत्य या कलाप्रकारात प्रथम आल्याबद्दल महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. ईश्वरी खाडे या विद्यार्थिनीचा तसेच युवा महोत्सवात शॉर्ट टेलिफिल्म मध्ये तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल यश केंद्रे, निखिल यादव, ईश्वरी खाडे, दीपक उखंडे, निखिल जाधव या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना व स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, १०० मीटर धावणे, गोळाफेक या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तसेच वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला, पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध ''डेज'', ट्रॅडिशनल डे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा, फिश पॉन्ड याचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या डेज निमित्त विविध वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच यानिमित्त आनंद नगरीचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्येही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कविता, शेरो शायरी, एकपात्री नाटक, भारुड, गायन व नृत्य यांचे उत्कृष्टपणे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.या स्नेहसंमेलनात एकूण ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जल्लोषात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.सचिन कळलावे, डॉ. राजेश जोशी, डॉ. महेंद्र आचार्य,डॉ. जी. डी. सूर्यवंशी, प्रा. जीवन कोंडरे, डॉ. संतोषकुमार सुर्वे, डॉ. प्रदीप लासोनकर, डॉ. संदीप काळे, डॉ. एस.डी. घन, डॉ. एस. सी. जाधवर, डॉ. सारिका संगेकर, डॉ. सारिका जगताप, सुशील कुलकर्णी, नंदकुमार बलुतकर, मनू कोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा