स्कॉलर केजी स्कूलचे दशकपूर्ती वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात!
लाईक आणि लव्ह यातला फरक अतिशय महत्वाचा -साहित्यिक प्रभाकर साळेगावकर
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
लाईक आणि लव्ह यातला फरक अतिशय महत्वाचा असतो, जे तुम्हाला आवडते ते तुम्ही तोडूनही घेऊ शकता पण ज्याच्यावर तुमचे प्रेम असते त्याची तुम्ही काळजी करता, निगा राखता, स्कॉलर केजी स्कूलने जाणीवपूर्वक निवडलेले स्वतःचे ब्रीद वाक्य "वी टीच वुईथ लव्ह" हे शाळेचे वातावरण आणि या शाळेतील शिक्षकांचा विद्यार्थ्यांप्रती असलेला व्यवहार सांगते असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक श्री प्रभाकर साळेगावकर यांनी स्कॉलर केजी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी काढले. श्री साळेगावकर यांनी आपल्या बाल कवितांच्या काही ओळीही इथे सादर केल्या आणि प्रेक्षकांची दाद मिळवली.
स्कॉलर केजी स्कूलचा दशकपूर्ती वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा लोकनेते नटराज रंगमंदिर सभागृहात गुरुवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रभाकर साळेगावकर, प्रसिद्ध गझलकार श्री प्रा डॉ मुकुंद राजपंखे, शनैश्चर अर्बन निधीची अध्यक्ष श्री वैजनाथ बेंडे तर अध्यक्षस्थानी श्री भीमाशंकर फुटके गुरुजी यांची उपस्थिती होती.
पाहुण्यांची व्यासपीठावर उपस्थिती होताच स्कॉलर केजी स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर अतिथींच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन झाले.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता चंद्रशेखर फुटके यांनी केले. आपल्या प्रास्ताविका त्यांनी शाळेच्या प्रगती बद्दल पालकांचे आभार मानत प्रत्येक आव्हानाला तोंड देत शाळा पुढे चालत असताना शिक्षिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे अतिथी प्रसिद्ध गझलकार प्रा डॉ मुकुंद राजपंखे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात कुटुंबाचे महत्त्व सांगत कुटुंबातील व्यक्तींनी शिक्षणात बजावलेली भूमिका याविषयीचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी त्यांनी आपली 'बाप' ही कविता सादर केली.
फुटके परिवाराची सदस्य असलेली कु डॉक्टर रेणुका भीमाशंकर फुटके हिने एमपीएससी मार्फत झालेली मेडिकल ऑफिसर ची परीक्षा उत्तीर्ण होत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला याबद्दल तिचे आई वडील भीमाशंकर फुटके गुरुजी व सौ आशा भीमाशंकर फुटके यांचा सर्व अतिथीनी सन्मान केला.
नॅशनल ओलंपियाड या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान पाहुण्यांच्या हस्ते व्यासपीठावर पालकांसह करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळाही प्रतिनिधिक स्वरूपात या ठिकाणी संपन्न झाला. महिला पालकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणानंतर उद्घाटन समारंभाचा समारोप झाला. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रवीण फुटके सर यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा कार्यक्रम पाहुण्यांच्या स्वागत गीताने उत्साहात सुरू झाला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वेदांत कुरवाडे आणि श्रेया कदम यांनी केले.
अनेक मराठी, हिंदी गीतांवर चिमुकल्यांची पावले सुमारे तीन तास थिरकत होती. शालेय जीवनाची सुरुवात असणाऱ्या या वयातील मुलांच्या विविध कलागुणांचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिवारातील सर्वच सदस्य उपस्थित झाल्याने लोकनेते नटराज रंग मंदिराची सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. मोबाईल ड्रामा विद्यार्थ्यांनी सादर केला त्यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या सजगतेविषयी कौतुक केले. सुमारे 20 गीतांची मेजवानी पालकांना मिळाली.
सभागृहात दूरवरच्या अंतरावर बसणाऱ्या पालकांना व्यवस्थित दिसावे म्हणून मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवेशद्वारावर रांगोळी काढून व्यासपीठाला अतिशय सुंदररित्या सजवण्यात आले होते.
काही गीतासाठी कोरिओग्राफी केलेल्या पूजा उपाध्याय तसेच शाळेला सहकार्य करणारे व विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करणारे श्री अरुण भांगे मामा यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संपूर्ण शिक्षिका, मदतनीस तसेच फुटके परिवारातील सदस्यांनी मेहनत घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा