धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीवर !
मुंबई, प्रतिनिधी...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्ष बांधणी व संघटनात्मक वाढीसाठी पक्षांतर्गत कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली. या कोअर कमिटीत सात जणांचा समावेश करण्यात आला आहे.यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीत समावेश करण्यात आला आहे.
देवगिरी बंगल्यावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनौपचारिक बैठक झाली.यात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी पक्षांतर्गत कोअर कमिटीची स्थापना केली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघठन बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांचा एक 'कोअर ग्रुप' स्थापन करण्यात आला आहे.आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांसह, पक्षसंघठनेची बांधणी, त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भातील महत्वाच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्वाचा उद्देश आहे.
कोअर ग्रुप सदस्यांमध्ये अजित पवार (उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष), खा. प्रफुल पटेल (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) खा. सुनिल तटकरे (प्रदेशाध्यक्ष),आ. छगन भुजबळ( जेष्ठ नेते), आ. दिलीप वळसे पाटील (जेष्ठ नेते), हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य), धनंजय मुंडे (अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांचा समावेश करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा