वाळु,राख, गौण खनिज उत्खनन आणि रेल्वे भूसंपादन...घेणार आढावा
ना. पंकजा मुंडे उद्या बीडमध्ये ; जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार बैठक
बीड जिल्ह्यातील अवैध वाळु उपसा, राखेची वाहतुक, अवैध गौण खनिज उत्खननाचा घेणार आढावा
धारुर येथील रेल्वे भू-संपादनाच्या मावेजा संदर्भातही घेणार बैठक
बीड ।दिनांक ०६।
जिल्ह्यात गेल्या कांही महिन्यांपासून सुरू असलेला अवैध वाळु उपसा, राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण, अवैध गौण खनिज उत्खननामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या सर्व जिव्हाळ्याच्या विषयावर राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशूसंवर्धन मंञी ना. पंकजाताई मुंडे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार असुन सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उद्या ( ता. ०७ ) सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली असुन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात गेल्या कांही महिन्यांपासून अवैध वाळु उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असुन अवैध डोंगर पोखरल्यामुळे पर्यावरणाची जी हानी होत त्यावर कुठे तरी प्रतिबंध येणे आवश्यक आहे. औष्णिक वीज केंद्रातुन बाहेर पडणाऱ्या राखेची अवैध पध्दतीने वाहतुक होत असल्याने प्रदुषणातही वाढ झाली आहे. या सर्व बाबी पर्यावरणाशी संबंधित असल्याने ना. पंकजाताई मुंडे या सर्व विषयाचा आढावा घेवुन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहेत.
धारुर येथील रेल्वे भूसंपादनाच्या मावेजाची बैठक
------
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत वारंवार उद्भवणाऱ्या अडचणी सोडवून मावेजा मिळवुन द्यावा अशी मागणी करत धारूर तालुक्यातील कांही शेतकऱ्यांनी माजी खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांची आज भेट घेतली होती. या संदर्भात डॉ. प्रितमताई मुंडे यांनी ना.पंकजाताई मुंडे यांना पञ लिहून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्देश देण्याची मागणी केली होती, त्यानुसार उद्या सायंकाळी ४.४५ वा. वाजता महसूल विभाग, भूमीअभिलेख विभाग, कृषी विभाग आणि रेल्वे विभागाची संयुक्त बैठक ना. पंकजाताई मुंडे घेणार आहेत.
•••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा