विद्यार्थ्यांनो संशोधक होण्यासाठी आपल्या ज्ञानाचा व्यासंग वाढवा - सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):- विद्यार्थ्यांनी संशोधक होण्यासाठी आपल्या ज्ञानाचा व्यासंग वाढवला पाहिजे, त्या विषयातील खोली वाढवली पाहिजे आणि आपल्या बौद्धिक क्षमतेच्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने संशोधक म्हणून विद्यार्थी नांवारूपाला येतील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी केले.
योगेश्वरी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग यांच्या द्वारे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील 'सूक्ष्म जीवांचा सभोवतालच्या परिस्थितीमध्ये समतोल राखण्यासाठी असलेली भूमिका' या अभ्यास परिषदेमध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सी.एल.बर्दापूरकर, प्राचार्य एम.व्ही.कानेटकर, प्रा.अविनाश सोनवणे,उपप्राचार्यआर.व्ही.कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी विद्यार्थी हा उपजतच संशोधक असतो शिक्षकांनी त्याच्या ज्ञानात भर घालून त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत. त्याला विषयाचे ज्ञान संपूर्णपणे दिले पाहिजे जेणेकरून त्या विषयाचा अभ्यास आणि त्या विषयातील बारकावे त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले पाहिजेत आणि त्या विषयाची गोडी निर्माण झाली तर आपोआपच विद्यार्थी विविध प्रकारचे संशोधन त्या विषयांमध्ये करू शकतात असे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. आपण आत्मसात केलेल्या ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग करून समाजाच्या दृष्टीने विधायक काम करीत राहणे हा बुद्धिमत्तेचा सरळ अर्थ आहे असे म्हणत विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता स्वतःच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी वापरावी असे आवाहनही डॉ.राजेश इंगोले यांनी केले. यावेळी बोलताना अध्यक्ष सी.एल.बर्दापूरकर यांनी योगेश्वरी महाविद्यालयाने अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर योगेश्वरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला नांवलौकिक केलेला आहे. विद्यार्थ्यांनी सजग राहून आपल्याला त्या विषयांमधले काय येते आणि काय नाही याचा अभ्यास करून आपल्या शिक्षकांमार्फत त्या विषयामधले उत्तम ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या ज्ञानाचा समाजाच्या उन्नतीसाठी, राष्ट्र उभारणीसाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी या परिषदेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच या परिषदेत आपले पेपर प्रकाशित करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या परिषदेत घेण्यात आलेल्या पोस्टर आणि संशोधन मॉडेल स्पर्धेत विजेत्या प्राप्त विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर, उपप्राचार्य डॉ.आर.व्ही.कुलकर्णी, डॉ.वाय.एस.हंडीबाग यांनी ही राष्ट्रीय पातळीवरील परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.एस.कदम तर उपस्थित पाहुण्यांचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.अनिल नरसिंगे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा