सोन्नर कुटुंबातील तीन यशस्वितांचाही आई वडिलांसह गौरव

 पतीच्या निधनाचे दु:ख पचवून शासकीय सेवेत मिळविले स्थान:वडखेल येथील वैशालीच्या जिद्दीचा सन्मान 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : 

       शिक्षण सुरू असतानाच तिचं लग्न झालं. लग्नानंतर वर्षभराच्या दुर्दैवाने पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर समोर काळाकुट्ट अंधार दिसत होता. परंतू तिच्या आई-वडिलांनी तिला धीर दिला. तिनेही पुन्हा नव्या आयुष्याची आखणी केली. पुन्हा अभ्यासाला लागली आणि शासकीय सेवेत वरिष्ठ लिपिक म्हणून स्थान मिळविले. ही कहाणी आहे वडखेल येथील वैशाली पद्मिनी मधुकर देवकते या तरुणीची. तिच्या या यशाबद्दल वडखेल ग्रामस्थांनी तिच्या जिद्दीचा सन्मान करण्यासाठी जाहीर सत्कार केला. याच वेळी सोन्नर कुटुंबातील अधिकारी झालेल्या तीन भावंडांचाही सत्कार करण्यात आला.

        वडखेल येथील पद्मिनी आणि मधुकर देवकते यांची वैशाली ही मुलगी. तिचे शिक्षण सुरू असतानाच तिचा विवाह नात्यातील एका युवकाशी करून देण्यात आला. परंतू लग्नानंतर काही महिन्यातच त्याचे निधन झाले. तिने न डगमगता पुन्हा अभ्यास सुरू केली. हे करीत असताना तिला आणि तिच्या आई-वडिलांनी खूप टोमणे सहन करावे लागले. सत्काराला उत्तर देताना तिने त्या वेदना मांडल्या तेव्हा तिच्या आई-वडिलांच्या आश्रूंचा बांध फुटला. वैशालीने आपले आश्रू आवरीत तुम्ही लोक काय म्हणतात याचा विचार न करता आपल्या धैय्यावर लक्ष केंद्रित करा, यश नक्कीच मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.

मी एसीत अभ्यास करायचो तेव्हा शेतात राबणाऱ्या आईचा चेहरा दिसायचा...

         वडखेल येथील कांताबाई शामसुंदर सोन्नर यांची तीन मुले अनुक्रमे माधुरी (कर निरीक्षक, विक्रीकर विभाग महाराष्ट्र शासन ) , ज्ञानेश्वरी (सहाय्यक कायदा अधिकारी, मुंबई महानगरपालिका) आणि साईप्रसाद (सिव्हिल इंजिनियर असिस्टंट) यांनी शासकीय सेवेत अधिकारी पद मिळविले आहे. त्यांचाही सत्कार वडखेल ग्रामस्थांकडून करण्यात आला.

        सत्काराला उत्तर देताना साईप्रसाद सोन्नर यांनी अत्यंत ह्रदयाला चटका लावणारे मनोगत व्यक्त केले. आम्ही भावंडांनी शिकावे यासाठी आई-वडिलांनी खूप कष्ट घेतले. माझी आई तर उन्हातान्हात शेतात राबत होती. दुपारी जेवणाच्या विसाव्याला बसली की तिचा रोज फोन यायचा. अभ्यासाची चौकशी करायची. अभ्यास सुरू होता. यश हुलकावण्या देत होतं. मी एसी अभ्यासिकेत बसून अभ्यास करत होतो आणि आई उन्हातान्हात राबत होती. पुस्तक वाचताना घामाने डबडबलेला तिचा चेहरा पुस्तकात दिसायचा. मग हताश व्हायचो. सरळ अभ्यास सोडून घरी यावं असं वाटायचं. पण आई धीर द्यायची. तेव्हा मी पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागायचो.  आज यशस्वी झालो. ज्या मुलांना शिकवण्यासाठी बाहेर पाठविले आहे,  त्यांनी आई-वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी, यश नक्कीच मिळेल, असे साईप्रसाद यांनी सांगितले.

             सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच भारतबाई व्यंकटराव देवकते या होत्या. यावेळी परळीचे माजी नायब तहसीलदार बी. एल. रुपनर, तसेच सूर्यकांत वडखेलकर यांचा निवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी पत्रकार प्रकाश चव्हाण, चंद्रकांत देवकते, माऊली महाराज आगलावे, अशोक देवकते आदींची भाषणे झाली. अनिल पांचाळ यांनी सूत्रसंचालन केले तर गणेश देवकते यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार