आपापली जबाबदारी ओळखून सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता टिकवा - मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)...

समाजात एकिकडे सर्वत्र वणवा पेटून सर्व काही बेचिराख होत असताना दुसरीकडे एक माणूस म्हणून माझी काय भूमिका असली पाहिजे हे कळले तरच समाज एकत्रीत राहील अन्यथा सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता भंग होईल असे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले.

येथील देशमुख कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक राम पडळकर, उद्योजक गणेश देशमुख, सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उद्धव शिंदे, आधार माणुसकी संस्थेचे ऍड.संतोष पवार, सरपंच शितल देशमुख, डॉ.प्रिया मुळे, प्राचार्य संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ.राजेश इंगोले यांनी गुणवंत हा केवळ ज्ञानाने किंवा उच्चशिक्षीत होऊन किंवा मोठ-मोठ्या पदव्या, नोकऱ्या घेऊन होत नाही. तर या सोबत त्याच्या व्यक्तिमत्वाला संस्कार आणि मानवी मूल्यांची जोड असावी लागते. शिक्षण आणि संस्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या पाहिजेत तरच मानवी संस्कार आणि मूल्य टिकतील. या कलियुगात वाढलेले अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दुभंगलेली नाती याचे प्रमाण पाहिले तर मग सध्याच्या स्थितीत शिक्षणाने प्रगती झाली आहे. की, अधोगती हे कळायला वाव नाही. समाजात वाढलेली गुन्हेगारी, दिवसाढवळ्या होणारे बलात्कार, खून, चोऱ्या, दरोडे हे निश्चितच भूषणावह नाही. एकीकडे भारत महासता होण्याच्या वल्गणा होत असताना दुसरीकडे मात्र देशात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, बेरोजगारांची संख्या वाढत आहे हा विरोधाभास आपल्याला लक्षात येत नाही का..? असा सवाल करीत आता समाजात होत असणाऱ्या अन्याय, अत्याचार याविरूद्ध सर्वसामान्य जनतेनेच पेटून उठले पाहिजे. समाजात हा वणवा पेटला असताना माझी भूमिका हा वणवा विझवणाऱ्याची असावी का पेटवणाऱ्याची हे उत्तरच या देशाला महासत्ता बनवू शकते. हा वणवा पेटला असतांना तुम्ही काय करीत होतात..? हा प्रश्न नक्कीच पुढची पिढी तुम्हाला विचारू शकते. त्यावेळी तुम्हाला त्यांना मी माझ्यापरीने हा वणवा विझविण्याचे प्रयत्न करीत होतो असे अभिमानाने सांगता आले पाहिजे असे सांगत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीयच ही प्रखर राष्ट्राभिमानी ओळ सदोदित हृदयात कोरून ठेवली पाहिजे असे आवाहन डॉ.राजेश इंगोले यांनी केले. यावेळी बोलताना भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी विद्यार्थ्यांनी सर्व महापुरूषांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे चालले पाहिजे तसेच आपल्या मतापित्यांचा, गुरूजनांचा जेष्ठ श्रेष्ठ, महिलाभगिनींचा आदर बाळगून समाजात वावरले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य संजय देशमुख यांनी ही संस्था शिक्षणासोबत संस्कार ज्ञानदान देण्याचे काम करीत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना ही संस्था गोरगरीब वंचित, शोषित समाजाच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यांना गुणवंत, प्रज्ञावंत, शिलवंत बनवत आहे आणि याच मार्गावर चालत राहील असे आश्वासन दिले. याप्रसंगी डॉ.उद्धव शिंदे, ऍड.संतोष पवार, गणेश देशमुख, सरपंच शीतल देशमुख यांनी प्रसंगोचित मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ.राजेश इंगोले, गणेश हाके व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संस्थेच्या संचालिका सुचिता देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार