आ. विजयसिंह पंडित यांनी सभागृहात मांडला प्रश्न...

 रामराज्यात श्रीराम देवस्थानाची जमीन सुरक्षित नाही !

मौजे चकलांबा ग्रामपंचायतीच्या अतिक्रमणाचा प्रश्न आ. विजयसिंह पंडित यांनी सभागृहात मांडला


मुंबई, दि.१९ (प्रतिनिधी) ः- अतिक्रमण दूर करण्याचे काम ग्रामपंचायत करते मात्र चकलांबा ग्रामपंचायतीने श्रीराम देवस्थान मालकीच्या जमीनीवर अतिक्रमण करून कचरा डेपोचे काम सुरु केले आहे. महायुतीच्या काळात ‘रामराज्य' सुरु असल्याचे लोक सांगतात मात्र या रामराज्यात श्रीराम देवस्थानाची जमीन सुरक्षित नाही अशी खंत आ. विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत व्यक्त केली. गेवराई तालुक्यात सुरु असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना आ.विजयसिंह पंडित विधानसभेत बोलत होते.


जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहार आणि चकलांबा ग्रामंपचायतीने श्रीराम देवस्थान मालकीच्या जमीनीवर केलेले कचरा डेपोचे अतिक्रमण या दोन विषयाला आ. विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत वाचा फोडली. यावेळी बोलताना आ.विजयसिंह पंडित म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत गेवराई तालुक्यातील १९२ गावांसाठी १७२ कोटी रुपये किंमतीच्या १७७ नळ पाणीपुरवठा योजनांची कामे मंजुर आहेत. विहित मुदतीत एकाही योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु होत आहेत. १९२  गावांपैकी १०% गावात सुध्दा सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. वॅपकॉस प्रा. लि. सारख्या तांत्रिक सेवा पुरवठादार कंपनी आणि संबंधित विभागातील अधिकारी यांच्या संगणमताने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी अक्षरशः वाया गेला आहे. प्रगती कन्स्ट्रक्शन सारख्या कंत्राटदाराने कोट्यावधी रुपयांची देयके उचलून पोबारा केला आहे. त्यामुळे या सर्व योजनांच्या कामाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत करण्याची मागणी आ.विजयसिंह पंडित यांनी केली.


मौजे चकलांबा ग्रामपंचायतीने श्रीराम देवस्थान मालकीच्या जमीनीवर केलेल्या अतिक्रमणाबाबत बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापनासाठी चकलांबा ग्रामपंचायतीला निधी मंजुर झाला. मात्र या ग्रामपंचायतीने श्रीराम देवस्थान या नोंदणीकृत ट्रस्ट मालकीच्या गट क्र.५७१ मधील जमीनीवर कचरा डेपोचे काम सुरु केले आहे. या ग्रामपंचायतीचा कारभार याच सरकारमधील क्लास वन अधिकारी हाकत आहेत. ‘अधिकारी-अधिकारी' अशी मिलीभगत सुरु असल्यामुळे आता श्रीराम सुध्दा चकलांबा सारख्या गावात सुरक्षित नाहीत. महायुतीच्या काळात रामराज्य सुरु असल्याचे काही लोक सांगतात मात्र याच सरकारच्या काळात श्रीराम देवस्थानाची जमीन आपण वाचवू शकतो का ? असा सवालही आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित केला.


चकलांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती खेडकर यांच्या कार्यकाळात श्रीराम देवस्थानाच्या जमीनीवर अतिक्रमण होत असल्याची तक्रार पवन लाहोटी यांनी केली होती. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक राजेंद्र मोराळे यांनी हे काम स्थगित करण्याऐवजी देवस्थानच्या जागेत अतिक्रमण आहे किंवा नाही या बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे केल्या आहेत. कागदी घोडे नाचवून प्रकल्प संचालक राजेंद्र मोराळे हे चकलांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच खेडकर यांना पाठिशी घालत आहेत का ? असा सवाल चकलांबा ग्रामस्थ विचारत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार