शाळेत अभिनव पद्धतीने महिला दिन: नाटिका,चित्रांचे प्रदर्शन,मनोगते;मुलींनीच केले कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन
कर्तृत्ववान महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान सांगणारी हिंदी भाषेतील नाटिका, विद्यार्थिनींनी महिलांचे महत्त्व सांगणारे रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांचे मनोगते आणि मुलींनी केलेले कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन हे वैशिष्ट्य होते आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी साजरा झालेल्या महिला दिनाचे!
विद्यार्थ्यांना संधी दिल्यामुळे त्यांच्या विविध गुणांचा विकास होतो हे लक्षात घेऊन शिक्षक आणि सतत मार्गदर्शकाचीच भूमिका बजावली पाहिजे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट या ठिकाणी शाळेच्या शिक्षिका श्रीमती प्रिया काळे आणि श्रीमती शुभांगी चट, पूजा गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी महिला दिन उत्साहात साजरा केला.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील शिक्षिका तसेच अंगणवाडीतील शिक्षिका राहीबाई सिरसाट यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड, सहशिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श्री सरोज कुमार तरुडे, श्री राजेश्वर स्वामी यांनी केले.
शिक्षिकांचे स्वागत शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांनी केले. महिलांचे कौतुक करणाऱ्या विविध चारोळ्या आणि हिंदीतील शेर सादर करत कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कुमारी कोमल गुट्टे आणि कुमारी चैतन्या गुट्टे यांनी केले. इयत्ता पाचवी ते आठवी वर्गातील मुलांनी महिला दिना वषयी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेतील शिक्षिका श्रीमती शुभांगी चट आणि शिक्षक श्री राजेश्वर स्वामी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
हिंदीत सादर झालेली नाटिका विद्यार्थिनींचा एक सारखा असलेला गणवेश आणि वेगळ्या पद्धतीने सादरीकरण यामुळे लक्षवेधी ठरली.
मनमोहक आणि महिलांचे सक्षमीकरण वेगवेगळ्या इंग्रजी शब्दांमध्ये दर्शवणारी रांगोळी आणि विद्यार्थिनींनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन असलेल्या हॉलचे रिबन कापून उद्घाटन शिक्षिकांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामपंचायत कासारवाडी चे ग्राम विकास अधिकारी श्री नागरगोजे साहेब यांनी याच कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांचा त्यांच्या आदर्श उपक्रमाबद्दल शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा