भावपूर्ण श्रद्धांजली......!
"नानासाहेब – एक विचार, एक युग"
परभणी जिल्ह्याच्या मातीला सुवर्णस्पर्श देणाऱ्या नानासाहेबांचे देहावसान झाले असले, तरी त्यांचा विचार, त्यांची शिकवण, आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाया आजही पंचक्रोशीत जिवंत आहे. नानासाहेब म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक चालतं-बोलतं विद्यापीठ होतं. त्यांच्या शब्दाला न्यायालयाचा कौल असायचा आणि त्यांच्या सल्ल्याला राज्यकर्त्यांच्या निर्णयाइतकं महत्त्व असे. गावात एखादा प्रश्न निर्माण झाला, की पोलिस ठाण्याऐवजी लोक नानासाहेबांच्या दारात गर्दी करत. न्याय, समजूत आणि संस्कार यांची त्रिसूत्री त्यांच्या प्रत्येक वर्तनात दिसायची.
नानासाहेबांचं मन म्हणजे समजूतदारपणाची एक खोल नदी होती. कोणाचंही मन दुखावू नये, कोणालाही अन्यायाची छाया स्पर्श करू नये, ही त्यांची वृत्ती होती. त्यांच्या बैठकीत जे एकदा बसले, ते मार्गदर्शन घेऊनच उठत. त्यांचा दरारा असला तरी त्यांच्या बोलण्यात नेहमी मृदुता आणि आपलेपणाचा स्पर्श असायचा. म्हणूनच पंचक्रोशीत त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. राजकीय मंडळींच्या यशस्वी वाटचालीत नानासाहेबांचा आशीर्वाद आणि सल्ला नेहमीच मोलाचा ठरला.
मला ज्या ज्या वेळी संधी मिळायची त्या त्या वेळी मी नाना साहेबांसोबत ३-४ तासं अगदी सहज गप्पा मारायचो. इतिहास, राजकीय घडामोडी, आपल्या देशातील आदर्श व्यक्ती - त्यांचे आयुष्य तथा आपण त्यांच्या कडून शिकलोच पाहिजे अश्या काही गोष्टी, देशातील महत्वपूर्ण ऐतिहासिक पर्यटनस्थळे आणि बरेच काही. छञपती शिवाजी महाराज आणि आदरणीय इंदिरा गांधी ह्या माझ्या वैयक्तिक आवडत्या विषयात तर त्यांनी मला बरेच बारकावे सांगितले. पुढे अध्ययन करता त्याचा तपशील तंतोतंत जुळायचा. गदिमांच्या गीत रामायणातील 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' आणि बाबूजींनी गायलेले 'देव देव्हाऱ्यात नाही' ह्या गाण्यांच्या २ ओळी तरी नक्की गायला लावायचे आणि डोळे मिटून शांतपणे ऐकायचे. रेकॉर्डिंग करून पाठवतो असे सांगायचो पण शेवटी ते राहिलेच - ह्या विष्मयासोबत आयुष्य जगावे लागेल ह्यात खरा तो खेद.
माझ्या सहचारिणीची वाढ ही बरेच अंशी नानासाहेबांसोबतच झाली आणि मला त्याचा अत्यंत फायदा झाला. स्वावलंबन, धाडसीपणा, करारीपणा, स्वच्छता, शिस्त, उद्योगीपणा, तोंडावर सत्य बोलण्याची कला आणि नेतृत्वक्षमता ह्या गुणांचा खास करून.मला आणि माझ्या मुलांनाही व्यक्तित्व वृद्धिंगत करण्यास त्याची बरीच मदत झाली. नानासाहेबांची अशात भेट व्हायची तेंव्हा मी त्यांना ह्याचे दाखले देवून धन्यवाद म्हणायचो तेंव्हा ते अभिमानाने स्मित हास्य करायचे आणि मग ते सुद्धा त्यांच्या लाडक्या 'मई' चे (माझ्या सहचारिणीचे) गुण सांगण्यात रंगून जायचे. एखाद्या कलाकाराला कसे त्याने घडवलेल्या कलाकृतीचा अत्यंत अभिमान असतो तसा तो अभिमान मला त्यांच्या चेहऱ्यावर जाणवायचा.
सकारात्मक ऊर्जा असणारे, प्रगतीचा आणि प्रबोधनाचा विचार सांगणारे पण तेवढेच भावनिक असणारे नानासाहेब जगण्याची ऊर्मी आणि कला शिकवून गेले,,माझ्या सारख्या एकाला नाही तर संपर्कात येणाऱ्या सर्वांना..त्यांच्या प्रत्येक शब्दात अनुभव अगदी दिसायचा आणि खऱ्या जीवनाचा उष:काल असायचा..आणि मी शक्य तितका तो अक्षरशः लुटला,,,स्वतः समृध्द होण्यासाठी !!
*"वो शख्स अपने किरदार से रोशन था,*
*जिसकी जुबां से खुदा की महक आती थी।"*
त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगा आणि पाच कन्यां ह्या नानासाहेबांचा सुसंस्कारी वारसा आणि शिकवणीला पुढे नेत आहेतच शिवाय त्यांचे जावई, नातवंडं, नात-जावई, नात-सूना ह्या सर्व उच्च शिक्षित, उद्योगपती आणि समाजसेवक असून समाजात एक नवा आदर्श निर्माण करत आहेत. नानासाहेबांचं मोठेपण केवळ त्यांच्या विचारांत नव्हतं, तर त्यांच्या कृतीत होतं. त्यांच्या शब्दातून समाजाला दिशा मिळायची आणि त्यांच्या कृतीतून समाजाला बळ. हे प्रकर्षानं आणि पदोपदी सिद्ध होतं.
नानासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन एका ध्येयासाठी अर्पण केलं - "समाजाला न्याय, समता आणि संस्कार देण्यासाठी." त्यांचा हा वारसा अखंड चालू राहणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. त्यांच्या नसानसात वाहणाऱ्या संस्कारांची शिदोरी पुढच्या पिढ्यांना आयुष्यभर साथ देत राहील.
नानासाहेब जरी देहाने आता आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची आणि माणुसकीची शिदोरी आपल्या मनात सदैव तेवत राहील आणि ते चिरकाल हृदयस्थ असतील.
नानासाहेब म्हणजे केवळ नाव नव्हतं, तो एक विचार होता… आणि विचार हा अमर असतो!
*फानुस बनके जिसकी हिफाजत हवा करें..*
*वो शमा क्या बुझें जिसे रोशन खुदा करें.."*
मन:पूर्वक श्रद्धांजली !💐🙏🏻
✍️ -प्रसाद कुलकर्णी (चिंचोलिकर) / गुरुभाई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा