दुसरा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर... बीडमधील शिक्षकांचा आक्रोश, थेट सरकारलाच दिला इशारा
बीड येथील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आत्महत्या केली. नागरगोजे हे १८ वर्ष बिन-पगारी काम करत होते. त्यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट निर्माण झाली. दरम्यान पुन्हा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा असे म्हणत धनंजय नागरगोजे यांच्या सहकारी शिक्षकांनी आवाज उठवला आहे."धनंजय नागरगोजे ज्या संस्थेमध्ये कार्यरत होते, तेथे काम करणाऱ्या अन्य शिक्षकांनी रोष व्यक्त केला आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषी लोकांवर कारवाई करण्यासाठी विनाअनुदानित शिक्षत आक्रमक झाले आहेत. धनजंय नागरगोजे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. त्याशिवाय त्यांच्या पत्नीला नोकरीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी सहकारी शिक्षकांकडून केली जात आहे."
'१८ वर्ष काम करुन घरी फुटकी कवडी देखील दिली नाही. लेकरा-बाळांना आम्ही काय उत्तर द्यायचं' असे म्हणत सहकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित आश्रम शाळेला व्हि जे एन टीच्या धर्तीवर शंभर टक्के अनुदान देण्यात यावे अशी मागणी संतप्त शिक्षकांनी केली आहे.
शिक्षकांच्या वतीने २५ मार्च रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये, असे शिक्षकांनी म्हटले आहे. दरम्यान धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणास सरकार आणि संस्थाचालक जबाबदार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा