शेतकऱ्यांवरील संकट गडद:आत्महत्यांचे प्रमाण वाढले; १९ मार्चला होणार अन्नत्याग
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-
केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटून दहा ते पंधरा टक्के राहिली आहे. तरीही तेवढ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जेवढ्या पन्नास ते साठ टक्के शेतकरी शेतीवर अवलंबून होते. याचा अर्थ असा की, केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबावरील संकट अधिक वाढले आहे. म्हणून या वर्षी किसानपुत्रांनी १९ मार्चला अन्नत्याग करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केले आहे.
प्रतिकुटुंबाला अठरा हजार द्या
ज्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न येऊ लागले, त्या कुटुंबातील आत्महत्या टळल्या आहेत असे दिसून येते. राहिलेल्या दहा ते पंथरा टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न कसे येईल याचा तातडीने विचार केला पाहिजे. सरकारी वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासाठी अठरा हजार रुपये महिना ठरवले आहे, तसे अठरा हजार रुपये महिन्याला या कुटुंबांना पोचविण्याची तरतूद सरकारने करावी. यासाठी इतर अनुदान बंद करावी लागली तर ती बंद करावी, अशी सूचना अमर हबीब यांनी केली आहे.
विशेष अधिवेशन बोलवा
संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या साहेबराव करपे कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येला एकोणीस मार्च रोजी एकोनचाळीस वर्षे होतात. या काळात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु लोकसभा व विधान सभेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजलीचा अर्पण करणारा साधा ठराव देखील करण्यात आला नाही. राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना शून्य झाले आहेत.
एकोणीस मार्च हा शेतकरी सहवेदना दिवस आहे, या दिवशी लोकसभा- विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे. आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी उपाययोजना करावी, असे आवाहन किसान पुत्र अमर हबीब यांनी केले आहे. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतींना तसे पत्रही पाठविले आहे.
ग्रामपंचायतीचे ठराव
लोकसभा-विधानसभा दखल घेईल की नाही हे आज सांगता येत नाही, तरी आज गावो गावच्या ग्रामपंचायतीच्या, ग्रामसभांनी 'आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धाजली' अर्पण करणारा ठराव करून महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतींना पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
उमरा येथे अन्नत्याग
एकोणीस मार्च २०२५ रोजी, अमर हबीब व त्यांचे सहकारी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील उमरा या गावात अन्नत्याग करणार आहेत.
या गावच्या भीमराव सिरसाट या शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी तहसील कार्यालयात फाशी घेऊन आत्महत्या केली होती.
या गावात दुपारनंतर सहवेदना सभा होईल अशी माहिती किसान पुत्र आदोलक अमर हबीब यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा