स्त्री शक्तीला ताकद देण्याचे काम शासन करतेय.....!
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ना.पंकजा मुंडे यांनी सभागृहात मांडल्या मनातील भावना
स्त्री शक्तीला ताकद देण्याचे काम शासन करतेय
● मुलींना कर्करोगापासून वाचविण्यासाठी शासनाने लस देण्याचे प्रयोजन करावे
● राजकारणात महिलांचा टक्का वाढायला हवा
मुंबई, दि. ७ : शासनाच्या योजना ह्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी असायला हव्यात. स्त्री शक्तीला ताकद देण्याचे काम शासनाने केले असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताईद मुंडे यांनी केले.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात आयोजित विशेष चर्चेत सहभाग घेताना मंत्री पंकजाताई मुंडे यांनी महिला शक्ती विषयी गौरवोद्गार काढून स्त्रीच्या महानतेची, तिच्या सहनशीलतेची गाथाच आपल्या भाषणातून व्यक्त केली.
मुली, महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगविषयी चिंता व्यक्त करून श्रीमती मुंडे म्हणाल्या की, मुलींना कर्करोगापासून वाचविण्यासाठी त्यांना शासनामार्फत लस देण्याचे प्रयोजन केले तर त्यांना कर्करोगाच्या धोक्यापासून वाचवू शकू.
महिलांनी स्वतः कमवायला पाहिजे, यासाठी त्यांना शिक्षण गरजेचे आहे. शासनाच्या योजना सशक्त मातांसाठी आहे, तथापि, सशक्त माता बरोबर त्या सशक्त मनुष्य व्हायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्त्रियांच्या ताकदीची महती सांगून मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, आम्ही स्त्रिया या खूप कठीण परिस्थितीला सामोरे जायला तयार झालेल्या आहोत.
स्त्रिया कठीण परिस्थितीला सक्षमपणे तोंड देतात.
त्या स्पष्ट बोलतात, राजकारणात डावपेच कमी खेळतात
स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर ती आत्मनिर्भर राहू शकते. शिक्षण आणि पोषण हे स्त्री सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे घटक आहेत. महिलांनी कधीही घेतलेले कर्ज बुडवलेले नाही; त्यामुळे आर्थिक व्यवहारात त्यांचा सहभाग वाढवावा. महिला बचतगटांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक योगदान दिले आहे.त्यांना कमी व्याजदरात कर्ज दिल्यास त्या उत्तम व्यवस्थापन करू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिला आरक्षणा व महिला सुरक्षा विषयावर मंत्री श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या की, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळाले आहे. आता राजकीय क्षेत्रात अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढायला हवा. महिलांना केवळ मदत मिळवणाऱ्या नव्हे, तर सक्षम नागरिक म्हणून उभे करणे गरजेचे असून त्यांचे मानसिक आणि सामाजिक सक्षमीकरण होणे आवश्यक. त्याच बरोबर महिलांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. महिलां विषयीच्या सायबर गुन्हे, अन्याय, शोषण यावर कठोर कारवाई आवश्यक आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना देहदंडाची शिक्षा देण्याचा निर्णय
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला त्याबद्दल त्यांचे आभार ही मंत्री महोदयांनी व्यक्त केल्या.
जलयुक्त शिवार ही स्त्रियांच्या डोक्यावरील घागर काढण्यासाठी झाला. त्यामुळे शासनाच्या योजनाचा जास्तीत जास्त लाभ महिलांना मिळावा, यासाठी मी ग्राम विकास मंत्री असताना प्रयत्न केले. मंत्री पदाच्या काळात अंगणवाडीच्या माध्यमातून महिलांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्त्रियांचा सन्मान, त्यांची आर्थिक आणि सामाजिक सक्षमता, शिक्षण, पोषण, आरक्षण, आणि सुरक्षा हे सर्व महत्त्वाचे मुद्दे आहेत. समाजाच्या आणि शासनाच्या मदतीने महिला सक्षम होऊ शकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात आणि देशाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा