गुरुचरित्र सारामृत पारायण व कथामृत सोहळ्याची सांगता !
परळी वैजनाथ ही आदिगुरूंची भूमी: येथील साधनेची अनुभूतीच वेगळी !
प्रत्येक जीव 'दत्त स्वरूप' माना;जीवनाचे कल्याण होणारच- परभणी दत्तधाम पिठाधिपती प.पू.मकरंद महाराज
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
सृष्टीतील प्रत्येक जीव भगवत स्वरूप असतो. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत 'हर कंकर- शंकर' अशी संकल्पना असुन प्रत्येक जीवमात्र हे दत्त स्वरूप माना असे आवाहन करत परळी वैजनाथ ही आदी गुरूंची भूमी आहे. या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामींनी अनुष्ठान केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या साधनेची एक वेगळीच अनुभूती प्रत्येक साधकाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन दत्तधाम परभणीचे पिठाधीपती प.पू. मकरंद महाराज यांनी परळी वैजनाथ येथे केले.
वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय श्री संतदास गणू रचित गुरुचरित्र सारामृत पारायण व गुरुचरित्र कथामृत सोहळ्याचा आज अतिशय उत्साहात व मंत्रून टाकणाऱ्या वातावरणात समारोप झाला.भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार मांणल्या जाणाऱ्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची तप साधनास्थळी म्हणजे आदीगुरू प्रभू वैद्यनाथाची ही भूमी आहे. या भूमीतील केलेले छोट्यात छोटे सत्कर्म व साधनाही मोठे फळ देणारी असते. या भूमीची जाज्वल्यता लक्षात घेऊनच नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी या ठिकाणी वास्तव्य करून आपले अनुष्ठान केले असणार हे लक्षात घेण्यासारखे आहे.आदीगुरु वैद्यनाथाच्या कृपेने गुरुकृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्र हे आरोग्य प्रदान करणारे स्थान असल्याने प्रत्येकाचे आरोग्य वृद्धिंगत निश्चित होईल. या ठिकाणी उपस्थित प्रत्येक जण दत्त स्वरूप असुन या पारायण सोहळ्यात सहभागी प्रत्येक साधकाची मनोकामना गुरुकृपेने निश्चित पूर्ण होईल असे आशीर्वचन दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांनी समारोप प्रसंगी केले.
वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप येथे झालेल्या या सोहळ्यात वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने परमपूज्य मकरंद महाराज यांचा हृदय सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर गुरुतत्त्व प्रदीप यांच्या वतीने ही वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे उपस्थित सचिव व सर्व विश्वस्त त्याचप्रमाणे परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, विविध सेवा देणाऱ्या सर्व सेवेकर्यांचा, मान्यवरांचा परमपूज्य महाराजांच्या हस्ते प्रासादिक सत्कार करण्यात आला. आजच्या सांगता समारंभाला प्रचंड संख्येने भाविक उपस्थित होते
पुष्पवृष्टीने झाली दिव्य सांगता
दरम्यान, या पारायण व कथामृत सोहळ्याची सांगता ही पुष्पवृष्टीने करण्यात आली. या ठिकाणी उपस्थित सर्व भाविकांनी विविध फुलांची उधळण करत गुरुभक्ती मध्ये तल्लीन होऊन दत्त नामाच्या जयघोषात पुष्पवर्षाव केला. पुष्पवृष्टीचे हे विलोभनीय दृश्य आणि भक्तीने मंतरलेले वातावरण यामुळे या सोहळ्यात एक विलक्षण भक्ती आनंदाची अनुभूती उपस्थितांना झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा