बीड जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर
परळी विधानसभा निवडणुक प्रक्रियेबाबत बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केलेले आरोप तथ्यहीन !
निवडणूक काळात रणजित कासले याला परळी मतदारसंघात ड्युटी नव्हतीच; त्याची नियुक्ती बीड सायबर विभागात होती
बीड जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर
बीड (प्रतिनिधी) - विधानसभा निवडणुक २०२४ अंतर्गत परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक व नंतरची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडल्या असून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने काही व्हिडिओ प्रसारित करून या निवडणूक प्रक्रियेबाबत व EVM मशीनच्या बाबत केलेले संपूर्ण आरोप खोटे, निराधार व तथ्यहीन आहेत, असा अहवाल बीड जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगास सादर केला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासले यांच्या आरोपांवरून परळी विधानसभेची निवडणूक व त्यानंतरची मतमोजणी व निकालापर्यंतचे संपूर्ण प्रक्रिया याबाबत निवडणूक आयोगाने बीड जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला होता. असे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे.
या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हा निवडणूक प्रक्रियेमध्ये परळी विधानसभा मतदार संघाशी संबंधित कोणत्याही ड्युटीवर नव्हता. मतदान केंद्र, स्ट्रॉंग रूम किंवा मतमोजणी केंद्र यापैकी कुठेही रणजीत कासले याची ड्युटी नियुक्त करण्यात आलेली नव्हती.
निवडणूक कालावधीत व विशेष करून ईव्हीएम आणि स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केंद्र व राज्य शासनाची मिळून तीन स्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली होती. अंतर्गत सुरक्षेमध्ये पहिल्या स्तरावरती केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान थेट evm मशीन जवळ तैनात होते. दुसऱ्या स्तरात इमारतीच्या परिघावर राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तर तिसऱ्या बाह्य स्तरांमध्ये जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
मशीनच्या जवळ असणारे पहिले दोन स्तर हे केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दलांकडून पुरवले गेल्याने त्यामध्ये स्थानिक पोलिसांच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर निवडणूक काळात रणजीत कासले याची निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणतीही नियुक्ती करण्यात आली नव्हती, त्या काळात तो बीड सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. असा स्पष्ट अहवाल पोलीस अधीक्षक बीड यांनी सादर केला असून, ईव्हीएम मशीन सील करताना तसेच उघडताना उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक निरीक्षक उपस्थित होते. पूर्ण स्ट्रॉंग रूम 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी खाली होत्या तसेच याबाबत किंवा ईव्हीएम च्या छेडछाडी बाबत कुठेही तक्रार आलेली नाही.
रंजीत कासले हे सातत्याने समाज माध्यमावर बेजबाबदार आणि अयोग्य विधाने करत आहेत. राज्यातील सन्माननीय मंत्री, लोकप्रतिनिधी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविषयी अनेक वेळा बदनामीकारक आणि निराधार वक्तव्य त्यांनी केले असून, त्यांनी स्वतःच आपण अनेकदा दारूच्या नशेमध्ये विधान करत असल्याचे मान्य केलेले आहे. रणजित कासले यांचा अपराध हा वैयक्तिक शिस्तभंग पुरता मर्यादित नसून सार्वजनिक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील गंभीर असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालात म्हटले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा