माझ्या हस्ते कामे सुरू व्हावीत ही संत भगवान बाबांचीच इच्छा
बीडच्या संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या विकास कामांचे ना.पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन
संत भगवान बाबांच्या शिकवणीमुळेच समाज आज स्वाभिमानाने प्रगती करतोय- ना. पंकजा मुंडे
माझ्या हस्ते कामे सुरू व्हावीत ही संत भगवान बाबांचीच इच्छा
बीड।दिनांक ०२।
'एकर विका, पण शिक्षण शिका' ही शिकवण राष्ट्रसंत भगवान बाबांनी दिली. या शिकवणीमुळेच समाज आज प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. आपण ऊस तोडणारे आहोत, कष्टाळू आहोत पण स्वाभिमानाने जगणारे आहोत. आजच्या तरूण पिढीने चुकीच्या गोष्टींच्या आहारी न जाता स्वतःची प्रगती साधावी असा मोलाचा संदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे दिला.
महाराष्ट्र शासन पर्यटन संचलनालय मार्फत प्राप्त झालेल्या निधीतून झालेल्या कामाचे लोकार्पण आणि नवीन कामांचे भूमिपूजन ना. पंकजाताई मुंडे यांच्या मोठया उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रतिष्ठानचे डाॅ. प्रभाकर धायतडक, आर टी गर्जे, डाॅ. अमोल लहाने, डाॅ शिवाजी सानप, शिवरूद्रानंद महाराज, योगेश क्षीरसागर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने विकास कामांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते विकास कामांच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करताना अतिशय आनंद होत आहे. संत भगवान बाबांना अभिप्रेत असलेला प्रगत, शिक्षित व स्वाभिमानी समाज घडविण्यात काहीतरी योगदान देता येत आहे याचे समाधान आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांनंतर तुम्ही सर्व लोकांनीच मला मायेचे पांघरून घातले. खंबीर पाठीशी उभे राहून मला शक्ती दिली. त्यामुळे मीही प्रामाणिकपणाने जे जे शक्य असेल तिथे सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत मार्गक्रमण करत आहे. कधीही स्वाभिमान सोडला नाही. ऊसतोड कामगार घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील राहून त्यांच्या जीवनात उन्नती आणण्याचा आपला प्रयत्न आहे. कष्ट, मेहनतीची तयारी आणि स्वाभिमान या त्रिसूत्री वरच आपला समाज सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती साधत आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य भगवान बाबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाले पाहिजे. भगवान बाबांच्या नावाने असलेल्या या प्रतिष्ठानच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्याचे भाग्य मला लाभल्याचेही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा