परळीतील गोवंश तस्करी ही संघटित गुन्हेगारी: गोमातांवरील विषप्रयोग प्रकरणी 'मक्कोका' लावण्याची गोरक्षण सेवा संघाची मागणी
परळी वैजनाथ प्रतिनिधी...
गेल्या अनेक वर्षापासून परळी व परिसरात गोवंश तस्करीच्या बाबतीत संघटितपणाने अवैधरित्या हा व्यवसाय करणारी संघटित गुन्हेगारी टोळी सक्रिय असुन गोरक्षण सेवा संघाने,गोरक्षकांनी वेळोवेळी सातत्याने, वारंवार पोलीस व संबंधित सर्व प्रशासनाला याबाबत पाठपुरावा केलेला आहे. मात्र ही गुन्हेगारी मोडीत निघाली नाही. काल (दि. 25) रोजी तर परळीत गोमातांवर विष प्रयोग करून त्यांची तस्करी करण्याचा अघोरी प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला असला तरी आरोपींना अटक झालेली नाही.या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन याप्रकरणी मक्कोका लावण्याची मागणी गोरक्षण सेवा संघाने केली आहे.
याबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात आज गोरक्षण सेवा संघ महाराष्ट्र ने निवेदन दिले असून या निवेदनाद्वारे गोमातांवरील विष प्रयोग प्रकरणी आरोपीविरुद्ध मक्कोका लावावा, तातडीने या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.गाईंना डांबून नेणे, गोवंशाची अवैधरीत्या तस्करी करणे आदी नेहमीचेच प्रकार परळी व परिसरात घडतात. याबाबत गोरक्षकांच्या वतीने वारंवार पोलिसांना व संबंधित प्रशासनाला निवेदने दिलेली आहेत. तसेच या प्रश्नावर परळीतील गोरक्षकांच्या वतीने बेमुदत उपोषणही करण्यात आले होते. हे उपोषण सोडवताना जी आश्वासने दिली ती आश्वासने ही प्रशासनाने पूर्णतः पूर्ण केलेली नाहीत. त्याचबरोबर परळी शहरात मोकाट जनावरांसाठीचा कोंडवाडा निर्माण करण्याचे आश्वासन परळी नगर परिषदेने दिले होते.परंतु अद्यापही परळीत कोंडवाडा निर्माण झालेला नाही. मोकाट जनावरांची, त्यातही गोवंशाची गुंगीची औषधे देऊन तस्करी करण्याचा अघोरी प्रकार धडधडीत उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असला तरी आरोपी आणि या संबंधित गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कोणताही तपास केलेला नाही. विषप्रयोग प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच गोमातांवर विष प्रयोग करण्याच्या या प्रकरणात आरोपी विरुद्ध मक्कोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र गोरक्षण संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने गोरक्षक ,नागरिक उपस्थित होते.
Click- संदर्भिय सविस्तर बातमी:
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा