पुण्यस्मरण .......!
स्मृ.आबाजीराव तायडे: समर्पित भीमगायक व गुणवंत तंत्रज्ञ
महात्मा बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीदर्शी विचारांचा वारसा जनमानसात पोहोचवणारे निष्ठावान आंबेडकरी लोकगायक आणि महापारेषणचे कर्तव्यदक्ष,गुणवंत सेवानिवृत्त तंत्रज्ञ आदरणीय आबाजीराव तायडे (अण्णा) यांचा २९ एप्रिल हा स्मृतिदिन! या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक कार्याचा आणि एका प्रेरणादायी जीवनप्रवासाचा कृतज्ञतापूर्वक आढावा घेणे म्हणजे एका समृद्ध पर्वाचे स्मरण करणे आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाच्या इतिहासात अनेक तेजस्वी व्यक्तींनी आपल्या कार्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. याच परंपरेतील एक आदरणीय नाव म्हणजे आबाजीराव तायडे. त्यांनी १९६५ साली 'समाज सुधारक गायन मंडळ' स्थापन करून आपल्या प्रभावी गायकीच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन परभणी जिल्ह्यातील आंगलगाव येथे लोकगायक आबाजी मेसाजी तायडे यांच्यासह यादव कांबळे, ज्ञानोबा कांबळे, देविदास नाटकर, लिंबाजी मस्के, वामन कांबळे, हरिभाऊ कांबळे, रंगनाथ कांबळे, गंगाराम साबणे, शेषेराव साबणे, मूंजाजी कांबळे, पिराजी कांबळे, त्र्यंबक तायडे, लक्ष्मण तायडे, अशोक कांबळे आणि साहेबराव तायडे यांसारख्या समर्पित कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली. या सर्व भीम सैनिकांनी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याचा दृढ संकल्प केला होता. त्यांनी अवघ्या महाराष्ट्रात बुद्ध आणि भीमगीतांचे ऊर्जादायी सादरीकरण केले. कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता, केवळ समाजातील अशिक्षित, अल्पशिक्षित आणि कष्टकरी बांधवांच्या प्रबोधनासाठी त्यांनी आपले उपजत कला कौशल्य समर्पित केले. या गायन मंडळात आबाजीराव तायडे आणि यादव कांबळे हे प्रमुख गायक म्हणून ओळखले जात, तर हरिभाऊ कांबळे आणि त्र्यंबक तायडे यांनी आपल्या दमदार ढोलकी वादनाने पंचक्रोशीत खास ओळख निर्माण केली होती. यादव कांबळे आणि मुंजाजी कांबळे हार्मोनियम, देविदास नाटकर झांज आणि लिंबाजी मस्के कडीवादन करायचे, तर गंगाराम साबणे आणि शेषेराव साबणे साथीदारांची भूमिका चोखपणे बजावत असत.
शिक्षणाचा अभाव असलेल्या कुटुंबात ३ ऑगस्ट १९५० रोजी परभणी जिल्ह्यातील आंगलगाव येथे आबाजी तायडे (अण्णा) यांचा जन्म झाला (त्यांचे मूळ गाव परळी वै. जवळील बोंदरगाव ). त्यांचा जन्म झाला तो काळ सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि स्वातंत्र्योत्तर चळवळींनी भारलेला होता. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या महत्त्वपूर्ण सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामुळे महाराष्ट्र एका नवीन चेतनेने भारलेला होता. अशा प्रेरणादायी वातावरणात अण्णांचे बालपण व्यतीत झाले. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्या ७० वर्षांच्या समृद्ध जीवनप्रवासात त्यांच्या पत्नी, आमच्या आई सत्यभामा आबाजी तायडे यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. अण्णांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात आईने कुटुंबाला एकसंध ठेवले. आई आणि अण्णा यांनी कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आणि आम्हाला, त्यांच्या मुला-बाळांना उत्तम शिक्षण देऊन समाजात सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. आमची बहीण सुनिता भगवान जगताप आपले कुटुंब सांभाळत धम्मकार्यात सक्रिय आहे. बंधू विष्णू तायडे महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत, तर धाकटे बंधू राहुल तायडे हे देखील विद्युत विभागात समर्पितपणे सेवा बजावत आहेत. आई-अण्णांच्या उदात्त संस्कारांमुळेच आज मी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. आज आम्ही जे काही आहोत, ते केवळ आमच्या आदरणीय आई-अण्णांमुळेच. स्वाती, इंजि. अजय, शुभम, वैभव, मधुरा, सुबोध, सम्यक, रसिका, ऋत्विका आणि सक्षम ही त्यांची लाडकी नातवंडे त्यांच्यासाठी नेहमीच आनंदाचा ठेवा होती! नातवंडांना खेळवणारे आणि सुनांना आपल्या मुलीप्रमाणे मानणारे प्रेमळ अण्णा सदैव आमच्या हृदयात जिवंत राहतील.
आमचे मार्गदर्शक आणि साहित्यिक बंधू प्रा. डॉ. संजय जाधव यांच्याबद्दल ते नेहमी गौरवाने बोलत. त्यांच्या मित्रमंडळींवरही त्यांचे निस्वार्थ प्रेम होते. बालासाहेब इंगळे, भीमयुगकार रानबा गायकवाड, राजू डापकर, शंकर सिनगारे, बबन मस्के, अनिलकुमार साळवे, लहू कांबळे, संतोष पोटभरे, तानाजी चौरे, विनोद लांडगे, बा. सो. कांबळे, प्रदीप भोकरे, अरुण सरवदे,मिलिंद घाडगे,दिलीप उजगरे, चंद्रकांत जोगदंड, विकास वाघमारे, स्वप्नील सिध्दांती, मदन ईदगे आणि मिलिंद मस्के यांसारख्या असंख्य स्नेही आणि हितचिंतकांना त्यांनी आपल्या हृदयात स्थान दिले.
वंचित आणि दुर्बळ घटकांमध्ये आत्मसन्मानाची ज्योत पेटवून त्यांना संघर्षासाठी सज्ज करणे आणि समाजात समता प्रस्थापित करणे हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. या चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते आणि लोककवी-गायकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त विचार आणि मूल्यांपासून प्रेरणा घेऊन आपले कार्य केले. याच स्फूर्तीतून स्मृतिशेष आबाजीराव तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'समाज सुधारक गायन मंडळा'च्या माध्यमातून एका महत्त्वपूर्ण सांस्कृतिक चळवळीला आकार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाचे आणि तेजाचे एक असे प्रभावी वलय निर्माण केले, ज्याच्या तेजोमय किरणांनी अनेक कवी, गायक, जलसेकार, लेखक, समीक्षक आणि विचारवंत विविध वैचारिक क्षेत्रांमध्ये कार्यरत झाले. काहींनी इतिहासातील दलितांचे शौर्य, पराक्रम आणि बौद्धिक संपदा यावर संशोधन सुरू केले, तर लोककवी वामनदादा कर्डक यांच्यासारख्या थोर भीमशाहिरांनी आंबेडकरी विचार जनमानसात रुजवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. यात आमचे वडील स्मृतिशेष आबाजीराव तायडे आणि त्यांच्या 'समाज सुधारक गायन मंडळा'चे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
आत्मसन्मान आणि सत्तासंघर्षाची पहिली ठिणगी संगीत आणि गाण्यांमधून निर्माण होणाऱ्या सांस्कृतिक रूढींच्या विरोधातून आणि त्याविरुद्धच्या उठावातून दिसून येते. गाण्यांमधून आणि संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यातील भावनांना जागृत करण्याची प्रचंड क्षमता दलित समाजाचा लढा सातत्याने पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाचा ऊर्जास्रोत ठरली आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमीनेही दलित समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी एका शक्तिशाली प्रेरक शक्तीचे कार्य केले. याची सुरुवात आंबेडकरी संमेलनातून झाली आणि हळूहळू लोकनाट्य आणि पथनाट्याच्या माध्यमातून ती अधिक प्रभावी आणि व्यापक झाली. प्रसिद्ध लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी आपल्या एका प्रसिद्ध रचनेत म्हटले आहे,
“तुफानातले दिवे आम्ही,
तुफानातले दिवे"
ही साधी वाटणारी गाणी अत्यंत प्रभावी आणि ऊर्जा देणारी होती. तरीही, यापैकी बहुतेक लोककलाकारांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही, कारण प्रसिद्धी मिळवणे हा त्यांचा कधीच उद्देश नव्हता. तथापि, सामान्य जनतेवर आणि महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीवर त्यांचा प्रभाव खूप मोठा होता. त्यांच्या हृदयस्पर्शी गाण्यांमुळे शाहीर घरोघरी पोहोचले. एकदा शाहीर भीमराव कर्डक यांचा जलसा पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "माझ्या दहा सभा आणि मेळावे आणि कर्डक यांचा एक जलसा समान आहे."
बहुजन समाजातील कलाकारांनी आपल्या समाजाच्या प्रबोधनासाठी सादर केलेली कलाकृती म्हणजेच जलसा होय. समाजातील तत्कालीन परिस्थितीचे वास्तववादी चित्रण करून लोकशिक्षण आणि मनोरंजन करणे हा त्याचा प्रमुख उद्देश होता. सावकार आणि ब्राह्मण यांच्या अन्यायी दबावाखाली पिचलेल्या बहुजन समाजाला जागे करणे आणि त्यांना अन्यायविरुद्ध विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक लढ्याला लोककवी आणि गायकांनी आपल्या लेखणीतून आणि सुमधुर गायनातून मोठी ताकद दिली.
प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून आदरणीय आबाजीराव तायडे यांनी १९६५ ते १९८० या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. गिरवली सबस्टेशन बुद्ध विहार समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव, पंचशील बुद्ध विहार आणि सम्राट अशोक विचार मंच, परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्या माध्यमातून त्यांनी धम्मकार्यातही सक्रिय सहभाग घेतला. १९८० ते २०१० या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात एक निष्ठावान तंत्रज्ञ म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या नाट्यस्पर्धेत सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी नेपथ्य आणि प्रकाशयोजना विभागात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या रंगभूमीवरील याच सक्रियतेमुळे मलाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले. ज्येष्ठ साहित्यिक-संपादक भीमयुगकार रानबा गायकवाड लिखित आणि प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित 'भीमयुग' या नाट्य निर्मितीत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने त्यांना "गुणवंत तंत्रज्ञ" म्हणून गौरवले.
मला अण्णांमधील अनेक गोष्टी प्रिय आहेत. त्यांनी केवळ माणसे जोडली नाहीत, तर रक्ताच्या नात्या पलीकडील अनेक अतूट स्नेहबंध निर्माण केले आणि ते आयुष्यभर जतन केले. आई-अण्णांना लाभलेले आपुलकीच्या माणसांचे हे भाग्य आपोआपच माझ्या वाट्याला आले. प्रिय अण्णा, तुमच्या त्यागाला आणि अथक परिश्रमाला आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तुमचे असणे आमच्यासाठी सर्वस्व होते... ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर आणि अविस्मरणीय पर्व होते... आज भौतिकदृष्ट्या सर्व काही असल्याची जाणीव आहे... पण तुमची नसलेली जागा एक मोठी आणि कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करून गेली आहे...
आपुलकी आणि माणुसकीच्या मूल्यांची जेव्हा चर्चा होईल, तेव्हा सर्वात अगोदर #अण्णा तुमची आठवण येईल. या जगात प्रत्येक व्यक्ती जन्म घेतो आणि एका निश्चित वेळी या जगाचा निरोप घेणे अटळ आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूही आहे, हा निसर्गाचा अपरिवर्तनीय नियम आहे आणि या नियमाला कोणीही अपवाद नाही. परंतु जीवन जगत असताना आपल्या हातून कोणाचेही मन दुखावले जाऊ नये याची आपण सदैव काळजी घेतली पाहिजे. आपल्या सहवासात असणारी प्रत्येक व्यक्ती एक दिवस आपल्यापासून दूर जाणार आहे, ही भावना मनात ठेवून आपण त्यांच्याशी नेहमी आपुलकीने वागले पाहिजे. हीच अनमोल शिकवण तुम्ही आम्हाला दिली. वडील आणि सूर्य यात एक महत्त्वपूर्ण साम्य आहे, दोघांच्या नसण्याने आपल्या आयुष्यात अंधार निर्माण होतो. तुमच्या निधनाने हातात हात घेऊन चालणारी आमची प्रेरणा हरपली! तुमचे उदात्त संस्कार आणि विचार घेऊनच आम्ही या जीवनप्रवासात पुढे चालत राहू...
"अंधाऱ्या रात्रीतून सूर्य उगवण्याची बात करू,
संकटांशी मित्रा धीराने दोन हात करू...
काल सुख आज दुःख दोघांना आबाद करू..
वादळे-तुफान येतील, छाती पोलाद करू...
पराजयाची भीती नको, शत्रुवर प्रहार करू,
सारे एकजुटीने पुन्हा, नवा एल्गार करू,
आपुलकीने माणूसकीचा, नवा गाव उभारू...."
अशीच प्रेरणा तुम्ही आम्हाला दिली. प्रिय अण्णा, आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला धैर्याने कसे सामोरे जावे हे तुम्हीच आम्हाला शिकवले... दिवसरात्र अथक परिश्रम करून, स्वतःच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी आणि समृद्ध जीवन दिले. ज्यांच्यामुळे आज समाजात आमची एक ओळख आहे, ते म्हणजे आमचे आदरणीय 'अण्णा'! तुम्ही आमच्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमी खंबीरपणे आमच्या सोबत होतात आणि नेहमी तसेच आमच्या पाठीशी उभे राहिलात. श्रद्धेय अण्णा, तुम्ही अपार कष्ट सोसले, स्वतःच्या सुखाचा विचार करणे राहून गेले, रंजल्या-गांजलेल्यांना जीवापाड प्रेम दिले, आणि सर्वांच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले! प्रत्येक क्षणी आता तुमचीच आठवण येते... आपल्या जिव्हाळ्याची माणसे दूर गेल्यावर डोक्यावरचे छत्र आणि पायाखालची जमीन सरकल्याचा अनुभव येतो. दुःखाचा मोठा डोंगर कोसळतो. जीवन जितके सुंदर आहे तितकेच ते दुःखदही असू शकते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुःखाला आपण धैर्याने सामोरे गेले पाहिजे, कारण दुःख हे सुखाचे दुसरे रूप आहे. खरंच, जीवन जसे सुंदर आहे तसेच ते कधी कधी वाईटही वाटते. असे वाटते की आपल्या प्रिय व्यक्तींनी आपल्याला कधीच सोडून जाऊ नये, पण निसर्गाच्या नियमापुढे कोणाचेही काही चालत नाही. कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे. हे क्षणभंगुर आयुष्य आपण खूप आनंदाने जगले पाहिजे. आपल्या जीवनात आपण इतरांचा तिरस्कार कधीच करू नये आणि कोणाचेही मन दुखवू नये. आपण आपल्या आणि इतरांच्या जीवनावर प्रेम केले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने एक चांगला माणूस म्हणून जगले पाहिजे. हीच उदात्त शिकवण अण्णा तुम्ही आम्हाला दिली. २९ एप्रिल २०२१ रोजी अण्णांनी या जगाचा निरोप घेतला. तुमच्या सहवासाची उणीव मात्र आयुष्यभर भासत राहील. तुम्ही आम्हाला एवढे निस्वार्थ प्रेम दिले की ते प्रेम फक्त प्रेम करणारी व्यक्तीच समजू शकते. तुमचे प्रेम आणि तुमचे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असतील.
सदैव स्मरणात!
पुण्यस्मरणा निमित्त कृतज्ञतेने आम्ही अर्पितो सविनय आदरांजली!
✍️ प्रा. डॉ. सिद्धार्थ आबाजी तायडे
पंचशील नगर, परळी वै.
मो. ९८२२८३६६७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा