डॉ. अशोक नारनवरे: एका विद्यार्थ्याच्या हृदयातून उमटलेले कृतज्ञतेचे स्वर
आदरणीय डॉ. अशोक नारनवरे सर, मी तुमचा विद्यार्थी याचा मला सार्थ अभिमान आहे.विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा हाडाचा शिक्षक कसा असू शकतो हे मी तुमच्या रूपात अनुभवलेले आहे.आपल्यासाठी पुस्तक म्हणजे जीव की प्राण ! पुस्तकावर अगाध प्रेम करणारा अवलिया.!
साहित्यांचे गाढे अभ्यासक म्हणून तुमची एक स्वतंत्र ओळख आहे.डोळसपणा बरोबरच सर्वस्तरातून निर्माण होणाऱ्या अवस्थेची जाणीव साहित्यात यायला हवी ,असा आपला नेहमी आग्रह असतो.
आपल्या माणसाच्या भावनेचा व अस्तित्वाचा सखोलतेने , संवेदनशीलतेने विचार करणारे तुमचे व्यक्तिमत्व ख-या अर्थाने मराठी साहित्य व समाजाची बांधिलकी अभिव्यक्त करते.
सर ,तुम्ही आमच्यासाठी महान आहात. आपण माझ्या सारख्या गरीब, निराधार ,विद्यार्थ्याला नवी दिशा दिलीत आणि त्याला माणूस बनवलत; म्हणून तर आमचा जीवनप्रवास सुखकर झाला.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पदवी शिक्षण घेताना मला आपला सहवास लाभला, पुढे तर आवडता विद्यार्थी म्हणून विशेष प्रेम व आपुलकी मला मिळाली, पुस्तक वाचनाची आवड निर्माण होऊन माझी वैचारिक बैठक तयार होण्यास मदत झाली, अक्षरश: मी आपणांस भेटायला रूमवर आलो की, तुम्ही मला एखादा वैचारिक ग्रंथ वाचण्यास देत असत...एवढेच नाही तर "तुम्ही पुस्तक वाचा मी स्वयंपाक करतो दोघेजण जेवण करू,"असा आग्रह असायचा ते क्षण आठवले की, आजही मन सदगदीत होते...जेवण झाल्यानंतर एक ना अनेक वैचारिक व स्फूर्तिदायी पुस्तक वाचण्यासाठी मला देत असत. त्याबरोबरच त्या पुस्तकाविषयी व ग्रंथाविषयी चर्चा सुद्धा करीत असत . त्यामुळेच मला वाचन-लेखणाची प्रचंड आवड निर्माण झाली.... याशिवाय विचारपीठावर बोलण्याची प्रेरणा ही सुद्धा तुमचीच आहे. सर तुमच्या घरचे ग्रंथ भांडारच तुमच्या वाचनाच्या आवडीचे साक्षीदार आहे.
सर, तुम्ही पडद्याआड राहून माझ्यासारख्या खचलेल्या नटाला सतत सामर्थ्य देऊन जीवनाच्या रंगभूमीवर जगायला, बोलायला,लिहायला शिकविणारे खरे शिल्पकार आहात .
आदरणीय सतीश( भाऊ) चव्हाण साहेब : सर्वसामान्य वा वंचिताचे ऊर्जा स्त्रोत्र हा भाऊंच्या कार्य कर्तुत्वावर जो लेख लिहिला त्या मागची प्रेरणा तुमचीच....! भाऊ म्हणजे मराठवाड्याचं लोकनेतृत्व, सामाजिकभान असलेला लोकनेता, तुमचा भाऊ बद्दलचा निष्ठित भाव माझ्या संवेदनशील मनाला स्पर्शून गेला.... भाऊ बद्दल चिंतनपर लेखन झालं पाहिजे त्यांच्या कार्य कर्तुत्वाचा आलेख फार मोठा आहे ते सर्वसामान्य पर्यंत पोहोचला पाहिजे सल्ला तुम्ही दिला म्हणून तर आदरणीय भाऊंचे कार्यकर्तृत्व या लेखात मांडता आले.
म्हणतात ना, शिष्य गुरु पेक्षा मोठा व्हावा या भावनेतून तुमचे डोळे आतुरलेले असायचे हाच धागा पकडून तुम्ही सतत कष्टत राहिलात.... माझी प्रगती पाहून तुमच्या डोळ्यात आनंदअश्रू येत असत तर नशिबी आलेले दुःख पाहून तुमचे मन अस्वस्थ होत असे....
सर, तुम्हीच तर माझ्यामध्ये रुजवले ना प्रामाणिकपणा,इमानदारी,सत्य हे संस्कार... या संस्काराची शिदोरी जवळ असल्यावर संकटावर मात करण्याचे बळ येते मग काय जीवनात येऊ द्या ना किती ही संकटे मी त्यांना सांगेन,...
संकटांनो खेळून घ्या,
संधी पुन्हा मिळणार नाही,
कर्पुराचा देह माझा,
झाल्याशिवाय जळणार नाही...! हा माझ्यात संचित झालेला दुर्दम्य आशावाद, इच्छाशक्ती शक्ती तुम्हीच तर प्रज्वलित...!
सरांच्या जीवनातील केंद्रबिंदू 'विद्यार्थी'... विद्यार्थ्यांच्या माध्यमाने त्यांचा परिवार जोडणे हीच खऱ्या शिक्षकांची आयुष्याची कमाई असते आदरणीय सरांनी खरी कमाई भरपूर केली.
गोरगरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यास वेळप्रसंगी सर्वतोपरी मदत... सरांच्या मार्गदर्शनामुळे वा संस्कारामुळे आज अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर विराजमान....
सर, प्रसिद्धीपासून कोसो दूर... त्याने लिहिलेले संशोधनपर लेख व पुस्तके म्हणजे त्यांनी घालून दिलेल्या वस्तूपाठाचा आदर्श नमुनाच म्हणावा लागेल.
सरांनी जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत,ऐकलेत, शिवाय जीवनात निर्माण झालेल्या संघर्षमय प्रसंगाला धीररोदत्तपणे सामोरे जातात पण कुणाविषयीची कटूता त्यांच्या उक्ती व कृतीतून जाणवत नाही.
सर, विविध परिषदा, चर्चासत्र, परिसंवादा मधील त्यांची व्याख्याने अभ्यासपूर्ण, त्यांना अस्सल संदर्भासल्याशिवाय वा प्रत्येक गोष्टीची सत्यता पडताळून ती चिकित्सक दृष्टीने अभ्यासली पाहिजे याबाबत नेहमी आग्रही...
सरांचे घर म्हणजे खरोखरच ज्ञानाचे व संशोधनाचे भांडारच जणू... विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,मित्रांना स्नेह,मार्गदर्शन घेण्यासाठी ज्ञानाची पाणपोई असलेले ते आधुनिक गुरुकुलच...! केव्हाही जा प्रेमाचा शब्द,आपुलकीची चौकशी, मनातील शंकाच निरासरन झाले नाही असे कधी झाले नाही.
आदरणीय गुरु,तुम्ही आम्हाला नेहमी सांगत आलात की,"कोणतीही कार्य पूर्ण होण्यात विचाराची किती जास्त भूमिका असते हे तुम्हाला कळलं तर तुम्ही कधी नकारार्थी विचार करण्याचे धाडस करणार नाही"या भूमिकेत आम्ही आजही जगतो आहे, आपल्या मार्गदर्शनाचा सहवासाचा प्रवास शब्दात न सामावणारा...
आज भौगोलिकदृष्ट्या दूर असलो तरी नित्य आपल्या अनमोल शब्दांच्या सहवासात आहे.
म्हणतात ना,
पावसाला अनुभव अन मातीकडून शिकावं... तसे तुमच्या अनुभवाने व सहसाने माझे जीवन समृद्ध करण्यास व भविष्यकालीन वाटचालीस दिशा मिळण्यास मदत झाली...
प्रभावी अध्यापन कौशल्य, विषयज्ञान अघाध, अभ्यासक, संशोधक यांना आदर्श मार्गदर्शक, कष्ट, त्याग, समर्पण यांचा मिलाफ, फुले-शाहू -आंबेडकर विचाराचे गाढे अभ्यासक, विद्यार्थीप्रिय,संवेदनशील मनाचे आमचे गुरु डॉ.अशोक नारनवरे सर यांना वाढदिवसाच्या अंत:करणपूर्वक शुभेच्छा!
निरोगी व आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच प्रार्थना!
✍️डॉ.बळीराम पांडे
अर्थशास्त्र विभाग,देवगिरी महाविद्यालय,छत्रपती संभाजीनगर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा