पिंपळपान गळालं तर म्हणे पिंपळगाव जळालं !

बीड:गृह राज्यमंत्र्यांच्या कथित मोबाईल चोरीचे मिडियाने रेटून चालवलेले प्रकरण: पोलीस अधीक्षकांनी काय केला खुलासा ?

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
        गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील घटना, घडामोडी व त्या संदर्भातील चालणाऱ्या बातम्या यामुळे विविध वृत्तवाहिन्यांनी पत्रकारितेचे अनेक वेळा संकेतही मोडल्याचेही समोर आले. कधी कधी काही घटनांमध्ये अतिशयोक्ती तर  कधी केवळ ऐकीव माहितीवर आधारित अतिरंजीतपणाने वृत्तांकन, त्याचे वारंवार, पुनर्वार्तांकन, पुनरावृत्ती अशा पद्धतीने बातम्या प्रसारित करण्यात येत आहेत. एक प्रकारे बीड जिल्ह्यातील काडी इकडची तिकडं झालेली घटनासुद्धा प्रचंड व्याप्तीची कशी आहे हेच बिंबवण्याचा प्रयत्न झाल्याचे अनेक वेळा दिसले. घटनांचे गांभीर्यपूर्वक वृत्तांकन ,बातमीचा विश्वासक स्त्रोत, या बाबी अनेकदा मिसिंग दिसतात. उथळपणा, केवळ कॅची मथळे आणि कोणत्याही बातमीला अतिरंजित स्वरुपात प्रदर्शित करुन केवळ बातमी चालते तर चालवा अन् व्हिव्ज मिळवा हेच प्राधान्य यातून दिसते.
       असाच काहीसा प्रकार गृहराज्यमंत्र्यांच्या मस्साजोग येथील दौऱ्यावेळी त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या.त्याही पोलिसात तक्रार दाखल केली असा दाखला देऊन दिवसभर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात याबाबत कोणत्याच पोलीस ठाण्यात तक्रार झालेली नाही.याबाबत आता बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक खुलासा केला असून या सर्व बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे.  एकंदरीतच बीड जिल्ह्यातील छोट्यात छोटी घटना, तीही कुठलीही अधिकृत माहिती किंवा त्याचा विश्वासनीय स्त्रोत नसताना बिनदिक्कतपणे चालवल्या जात आहेत.तसेच त्यावर लगेचच विश्लेषणात्मक, न्याय निवाड्याच्या,वेगवेळ्या समीक्षा इथपर्यंत बातम्या झाल्या. मात्र पोलिसांनी केलेल्या खुलाशानुसार मोबाईल चोरीचा असा काही प्रकार झालाच नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
        याबाबत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,आज दिनांक 05/04/2025 रोजी विविध  माध्यमांवर व विविध न्यूज पोर्टलवर योगेश कदम, राज्यमंत्री (गृह) महाराष्ट्र राज्य हे मस्साजोग ता. केज येथे आलेले असतांना त्यांचा मोबाईल गहाळ/चोरी गेल्याची बातमी प्रसारित झाली आहे. परंतु याबाबत सत्यता अशी आहे की, मंत्री महोदय हे मस्साजोग येथे धनंजय देशमुख व कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी धनंजय देशमुख यांचे शेजारी बसलेले होते. पत्रकारांशी संवाद साधताना  मोबाईल खाली ठेवला होता. त्यानंतर ते बांधकाम सुरू असलेले घराची पाहणी करण्यासाठी चालत गेले.  घराची पाहणी करत असताना त्यांनी  पीएंकडे मोबाईल मागीतला. त्यावेळी पीएंनी माझ्याकडे मोबाईल नाही असे सांगीतले. त्यावेळी मंत्री महोदय यांनी मोबाईल शोधा असे म्हटले. हे वाक्य उपस्थित लोकांपैकी कुणीतरी ऐकून बाहेर वाच्यता केली. 
       परंतु मंत्री महोदय व जिल्हाध्यक्ष अनिल जगताप हे जाण्यासाठी गाडीत बसले असता कोणीतरी मोबाईल आणून अनिल जगताप यांच्याकडे दिला. गाडीत बसल्यानंतर तो मोबाईल जगताप यांनी मंत्री महोदयांना दिला. मंत्री महोदयांना मोबाईल दिला हे बाहेर माहीत नसल्यामुळे या अफवा पसरवल्या गेल्या.मंत्री महोदय यांचा मोबाईल गहाळ झालेला नाही. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार