पर्यावरणीय घटकांचा खेळखंडोबा मांडणारांना चाप बसणार का ?

 परळीत 'नदी पुनरुज्जीवनाचे' तर दूरच 'नदी निर्मुलनाचे' मात्र बिनदिक्कत प्रयत्न!

आधी नदीचा झाला नाला आता नाल्याची छोटी नाली करण्यालाही प्रतिबंध नाही :नगर परिषदेला परळीचं नेमकं करायचयं काय?

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
     एका बाजूला नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अटोकाट धोरण आखले जात आहे. अधिकाधिक नद्यांचे पुनरुज्जीवन ,खोलीकरण, सपाटीकरण, पात्र विस्तारीकरण आदी बाबींना प्राधान्य देऊन अधिकाधिक नद्या, उपनद्या,ओढे, नाले प्रवाही करणाऱ्यांवर शासनाकडून भर दिला जात असतांना वैद्यनाथाच्या परळीत 'नदी पुनरुज्जीवनाचे' तर दूरच 'नदी निर्मुलनाचे' मात्र बिनदिक्कत प्रयत्न सातत्याने होतांना दिसत आहेत.
      परळी वैजनाथ शहराला अनादी काळापासूनचा जाज्वल्य इतिहास आहे.पौराणिक काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत आणि सांप्रत काळात परळी वैजनाथ गाव, पंचक्रोशी याच्या नैसर्गिक पाऊलखुणा, संदर्भ, भौगोलिक वर्णनं आहेत. मात्र हे सर्व पुसून टाकून लुप्त करण्याचाच घाट घातला आहे की काय असा प्रश्न निर्माण करणाऱ्या बाबी इथे सातत्याने घडत असतात. असाच काहीसा प्रसंग सरस्वती या गावभागातून वाहणाऱ्या नदीबाबत दिसुन येत आहे.परळी शहर ज्या नदीवर वसले आहे त्या पुरातन सरस्वती नदीत अगोदर प्रचंड अतिक्रमणे आहेत. नदीपात्राच्या बाजूंनी अगोदर अतिक्रमणे होत राहिली.आता तर चक्क नदी खोदून अर्ध्या नदीत भिंत बांधण्यासाठीचे काम गेल्या दहा बारा दिवसांपासून सुरु असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या ठिकाणी अनधिकृत खोदकाम सुरू करण्यात आले. याकडे ना नगर परिषदेचे लक्ष गेले ना गावभागातील पुढाऱ्यांना याचे काही वाटले.एरव्ही परळीकर-परळीकर म्हणून अस्मितेचा डंका पिटवणार्या एकालाही हे दिसले नसेल की बघायचेच नसेल असा सवाल उपस्थित होत आहे.
          सरस्वती नदी पात्र हे मुळ ६० फुटांचे असुन सध्या याठिकाणी  २० ते ३० फुटांचेच पात्र शिल्लक राहिलेले दिसते.सरस्वती नदीला मागच्या वर्षी पावसाळ्यात अशा अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांमुळे मोठा पुर येवून नदीकाठावरील वस्त्यांत, आंबेवेस व बरकतनगर परिसरातील अनेक घरांत पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले होते. या नदीवर करण्यात आलेले अतिक्रमणे काढून टाकण्यात येतील असे आदेश नगरपालिका प्रशासनास देण्यात आले होते पण अद्याप एकाही अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली नसल्याचेच वास्तव आहे. याउलट आता तर आंबेवेस परिसरात चक्क सरस्वती नदीत विनापरवानगी, अनाधिकृत  उत्खनन करण्यात येत आहे. याची दखल घेऊन नदीवर चढाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार- मुख्याधिकारी

        यासंदर्भात मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे  यांनी घटनास्थळी भेट देऊन अनाधिकृत काम तूर्तास थांबविल्याचे सांगितले.मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे  यांनी सांगितले की,नदीचे पात्र ५० ते ६० फुट असून या नदीचे लवकरच खोलीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आज जे कोणी या नदीवर अतिक्रमण करत आहे. त्यांची माहिती घेऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अन्यथा पुराने हाहा:कार माजू शकतो......

       जुन्या गाव भागातील रहिवासी भाजपचे युवा नेते अश्विन मोगरकर म्हणाले की, गावभागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीपात्रात चक्क सकाळपासून खोदकाम सुरू होते. नगरपरिषद प्रशासनाला तात्काळ कळवले मात्र अधिकारी सायंकाळी तिथे आले. मागच्याच पावसाळ्यात नदीला पूर येऊन पाणी अंबेवेस, गंगासागर नगर, बरकत नगर भागात घुसले होते. नदीपात्रात बांधकाम झाले तर गावभागात महापूर येऊन हाहाकार माजू शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार