चार पानाची चिठ्ठी लिहून संपवले जीवन....
नोकरीसाठी वीस लाख दिले पण पगार नाही :शिक्षकाने केली गळफास घेवून आत्महत्या
परभणी, प्रतिनिधी:- मानवत तालुक्यातील मंगरुळ बु. येथील श्री नृसिंह शिक्षण प्रतिष्ठान संचलित श्री नृसिंह प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक सोपान उत्तमराव पालवे यांनी संस्थेच्या सचिवांनी शुध्द फसवणूक केल्याचा गंभीर आरोपी करीत शेतात गळफास घेवून आत्महत्या केली.
परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात एका झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत पालवे यांचा मृतदेह आढळून आला तेव्हा कुटूंबियांसह नातेवाईक व मित्रपरिवार अक्षरशः हादरले. धावपळ करीत कुटूंबियांनी पालवे यांना त्या स्थितीत परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकार्यांनी पालवे यांना मृत घोषित केले.
दरम्यान, पालवे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चारपानी एका पत्रातून श्री नृसिंह शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव बळवंत खळीकर यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे. आपण चार वर्षांपूर्वी 20 लाख रुपये नोकरीकरीता नगदी दिले. त्यावेळी 40 टक्के अनुदान पदावर घेतो असे ते म्हणाले होते. हे पैसे देण्याकरीता आपण स्वतःचे शेत विकले. नातेवाईकांकडून उधार-उसणे पैसे आणले व ते सर्व पैसे स्वहस्ते खळीकर यांना दिले. परंतु, या संस्थेने बनावट संच मान्यता व इतर बनावट कागदपत्रे सादर करुन 2018-19 च्या संच मान्यतेनुसार 20 टक्के शालार्थ प्राप्त करीत वेतन चालू केले. मार्च 2024 चे बिल सुध्दा 20 टक्क्यावरुन थेट 60 टक्क्यांने काढले. परंतु, त्यासाठी खळीकर यांनी आपल्याकडून पुन्हा पाच लाख रुपये अतिरिक्त घेतले. मार्च 2024 च्या बिलानंतर एप्रिल, मे आणि जूनचे बिल या संस्थेने काढलेच नाही. जूलै चे बिल 60 ऐवजी 20 टक्क्याने काढले. जून पासून मार्च 2025 पर्यंतचे 20 टक्क्याचे बिल काढण्यासाठी माझ्याकडून वेतनानंतर अर्धे पैसे खळीकर यांनी उकळले, असाही आरोप पालवे यांनी या पत्राद्वारे केला.
संस्थेने केलेली ही शिक्षक भरती बोगस आहे. त्या बाबत आपण विचारणा केली असता खळीकर यांनी आपणास संस्थेतून काढून टाकण्याची धमकी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्यामार्फत विविध प्रकारे दबाव आणला, असे नमूद करीत संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण व सचिव बळवंत खळीकर हे शाळा भेटीस आल्यानंतर आपणास खळीकर यांनी बोलावून सचिवांच्या लेटर पॅडवर राजीनामा द्यावयाच्या सूचना दिल्या, तसेच तुझे पैसेही परत देणार नाही, असेही ठणकावल्याचे पालवे यांनी या पत्रातून नमूद केले.
आपण साधारण कुटूंबातील आहोत, या फसवणूकीच्या विरोधात लढण्याचे सामर्थ्य आपणास नाही, त्यामुळे आपण कुठलाही पर्याय नसल्याने आत्महत्या करत आहोत, आपल्या पश्चात संस्थेच्या सचिवांना मृत्यू बद्दल जबाबदार धरावे व कुटूंबियांना संपूर्ण रक्कम व्याजासह द्यावी, अशी अपेक्षा पालवे यांनी या पत्रातून व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा