पंकजा मुंडेंच्या निर्देशानंतर प्रशासन खडबडून लागले कामाला
परळीतील पुरातन सरस्वती नदीवरील अतिक्रमण घाणीचं साम्राज्य: महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पहाणी
पंकजा मुंडेंच्या निर्देशानंतर प्रशासन खडबडून लागले कामाला
परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील सरस्वती नदीपात्रातील अतिक्रमणे व घाणीचे साम्राज्य पाहून प्रचंड संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले होते.नगर परिषद प्रशासनाने त्यानंतर तातडीने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. लगेचच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून तब्बल तीन तास नदीपात्रावर प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली असुन नगर परिषदेकडे याबाबतच्या आवश्यक कागदपत्रांची मागणीही करण्यात आली आहे.
परळी शहरातुन वाहत असलेल्या पवित्र सरस्वती नदीची प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या परभणी उपविभागीय अधिकार्यांनी पाहाणी केली.यावेळी अधिकार्यांनी नगरपालिकेच्या अनेक विभागातील कागदपत्रे मागवत या नदीसंदर्भात आकडेवारी घेत पाहाणी केली.यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असुन सध्या या नदीवर संरक्षण भिंत बांधण्याची प्रक्रिया सुरु असल्याने प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्यांची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरासमोरुन शहरात वाहणार्या सरस्वती नदीला सध्या गटाराचे स्वरुप आलेले आहे.नदीच्या दोन्ही बाजुंनी अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात नागरीकांच्या घरात पुराचे पाणी शिरत आहे.यातच अंबेवेस भागात नदीपात्रात खोदकाम करुन पात्र अरुंद केले जात असताना पशु संवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देवुन न.प.अधिकार्यांना फैलावर घेतल्यानंर अतिक्रमणे हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या.पंकजा यांच्या भेटीनंतर आता प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे परभणी येथील उपप्रादेशिक अधिकारी सोमनाथ कुरमुडे यांच्या टीमने परळी नगरपालिकेस भेट दिली.यावेळी त्यांनी सरस्वती नदीचा उगम,शहरातील अंतर,नदीपात्राची रुंदी याबरोबरच परळी शहराला दररोज लागणारा पाणीपुरवठा,शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांची सद्यस्थिती आदींची आकडेवारी घेत नगरपालिकेचे नगर अभियंता बेंडले यांना सोबत घेत सरस्वती नदीच्या उगमापासून ते परळी नगरपालिका हद्दीपर्यंत अशा पाच कि.मी.ची पाहाणी केली.यावेळी या अधिकार्यांना नदीपात्रात जागोजागी झालेले अतिक्रमण,कचर्याचे ढीग दिसले.जवळपास तीन तास पहाणी केल्यानंतर हे अधिकारी परभणीकडे रवाना झाले.
तपासणीनंतर अहवाल पाठवणार !
मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर प्रदुषणासंदर्भात आम्ही परळी शहरातील सरस्वती नदी व शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेची पाहणी केली.आम्हाला आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे व आकडेवारी नगरपालिकेकडुन घेतलेली असुन याबाबत आम्ही वरिष्ठांना अहवाल पाठवणार आहोत.
- सोमनाथ कुरमुडे
उपप्रादेशिक अधिकारी प्र.नि.म.परभणी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा