महापुरुषांच्या डीजे मुक्तजयंतीचा संकल्प

महापुरुषांच्या जयंती उत्सवात माणूस जोडण्याचे प्रयत्न व्हावेत ; मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ

परळी / प्रतिनिधी...

     महापुरुषांच्या जयंती मध्ये डीजेच्या तालावर कर्कश आवाजात नाचून तरुणाई बिघडवण्यापेक्षा वैचारिक आणि अध्यात्मिक विचार मंथनातून नवी पिढी घडवण्याचा संकल्प सिरसाळा पंचक्रोशीच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी त्रिजन्मशताब्दी सोहळ्यात करण्यात आला. जात-धर्माच्या पलिकडे जाऊन माणूस घडविण्याचा प्रयत्न अशा जयंती महोत्सवातून व्हावा असा आशावादही यावेळी सर्व वक्त्यांनी व्यक्त केला.

                  

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सिरसाळा पंचक्रोशीच्या वतीने पंचदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा बुधवारी रेणुका माता मंदिर, सिरसाळा येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर वाघमोडे तर उद्घाटक म्हणून शेतकरी नेते अजय बुरांडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते अमर हबीब, डॉ. राजाराम मुंडे, बालासाहेब दोलताडे, व्यंकटेश चामणर, दिलीप आबा बिडकर, संतराम गडदे, बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, अशोक करे आदी मान्यवर उपस्थित होते. 

          

कार्यक्रमा मागील भूमिका स्पष्ट करताना संयोजक शामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले की, महापुरुषांच्या जयंती मधून समाजाला काहीतरी दिशा मिळाली पाहिजे, परंतु आज आपण पाहतो आहोत की, कोणत्याही महापुरुषाची जयंती ही डीजेच्या दणदणाटात आणि नशेच्या धुंदीत पार पडते. यातून त्या महापुरुषांच्या विचाराचा जागर होण्याऐवजी त्यांच्या विचारांना तिलांजली दिल्याचे दिसून येते. म्हणूनच डीजे मुक्त जयंती साजरी करता येऊ शकते. याचा वस्तू पाठ घालून देण्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांच्या त्रिजन्मशताब्दी सोहळ्या निमित्ताने हे वैचारिक जागरण मांडले आहे. या  कीर्तन महोत्सवातून मोक्षमुक्तीचा विचार दिला जाणार नाही तर संतांनी आणि महामानवाने मांडलेल्या मानवतेचा विचार मांडला जाईल. जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस आपण एक झालं पाहिजे. यासाठी हा सोहळा आहे असे शामसुंदर महाराज म्हणाले.

             

शेतकरी नेते अमर हबीब यांनी या वेळेला शेतकरी नेमका कोणत्या कारणाने अडचणीत आहे याची माहिती दिली. कोणतेही नैसर्गिक संकट आलं की पहिला शेतकरी भरडला जातो. शेतकरी दुबळा आहे आणि त्याला जास्तीत जास्त दुबळ्या ठेवण्याचे काम इथले शासन व्यवस्था करते आहे असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना उद्घाटक अजय बुरांडे म्हणाले की, या कार्यक्रमातून सध्या समाजामध्ये जात, धर्म यावरून जी दरी निर्माण झाली आहे, ती दरी सांधण्याचा प्रयत्न केला जाईल. कान्नापूर येथील शेतकरी कीर्तन महोत्सव, सिरसाळ्याचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिजन्मशताब्दी सोहळ्याचा उत्सव हा माणूस जोडण्याचा प्रयत्न आहे, यातून समाजात सकारात्मक बदल घडतील असा अशावाद बुरांडे यांनी व्यक्त केला.

               

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभाकर वाघमोडे म्हणाले की, सध्या महापूरुषांच्या जयंत्यामधून  चांगले विचार समाजात रुजविण्या ऐवजी बहुतांशी तरुणाई बिघडत आहे. कोणत्या तरी नेत्याकडून देणगी आणायची, डीजे लावायचा त्यातून तरुणाई बिघडत आहे. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी डीजे मुक्त आणि वैचारिक मंथन करणारी जयंती कशी साजरी करता येईल याचा उत्तम वस्तूपाठ घालून दिला आहे. यावेळी डाॅ. राजाराम मुंडे, बाबूराव रुपनर यांचीही भाषणे झाली. देवराव काळे, सतीश काळे, व्यंकटेश काळे, गोरख काळे, सुधाकर काळे, अशोक गलांडे, मुंजाभाऊ होनमाने, शिवाजी काळे, नितेश काळे आदींनी सिरसाळावासियांच्या वतीने सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन बंडू खांडेकर यांनी तर मुन्ना काळे यांनी आभार मानले. यावेळी तुकाराम येवले, बबनराव सरोदे, विशाल देवकते, रत्नाकर देवकते, चंद्रकांत देवकते, अशोक देवकते आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार