वैष्णवीच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना कडक शिक्षा होईल
ना.पंकजा मुंडे यांनी पुण्यात कसपटे कुटुंबियांची घेतली भेट ; परिवाराचे सांत्वन करत दिला धीर
वैष्णवीच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना कडक शिक्षा होईल
पुणे ।दिनांक २४।
वैष्णवी हगवणे वर मोठा अन्याय झाला आहे, ज्यांनी कुणी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शिक्षा होईल असं राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी येथे सांगितलं.
ना. पंकजा मुंडे यांनी आज पुण्यात वैष्णवीच्या माहेरी जावून तिचे वडिल अनिल कसपटे व कुटुंबियांची भेट घेतली ,त्यांचे सांत्वन केले तसेच त्यांना धीर दिला, त्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या. यासंदर्भात बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, वैष्णवीच्या परिवाराला आज भेटले, त्यांचं म्हणण ऐकून घेतलं, त्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णवी वर ज्या प्रकारे अन्याय झाला आणि तिचे प्राण गेले ते ऐकून महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणूस देखील सुन्न झाला. प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला लाडाने वाढवितात, तिच्या विवाहासाठी सर्वस्व पणाला लावतात, तिच्या सुखासाठी प्रयत्न करतात, पण अशा पध्दतीने मुलीचा प्राण गेला तर त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं रहात. कसपटे कुटुंबाने तिच्या सुखासाठी सर्व केलं तरी देखील वैष्णवी चे प्राण गेले. ही घटना खरोखरच वेदना देणारी आहे. मी वैष्णवीच्या परिवाराच्या पाठिशी आहे. राज्याची एक मंत्री व महिला म्हणून मी त्यांना आश्वस्त केले आहे, त्यांच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. मुख्यमंत्री महोदयांशी पण त्यांची चर्चा झाली आहे. परिवाराच्या म्हणण्यानुसार ज्यांनी कुणी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला आहे त्यांना कडक शासन झाल्याशिवाय राहणार नाही असं ना. पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितलं.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा