बघा : कधीपासून कधीपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी राहणार बंद?
२६ तारखेपासून तब्बल एक महिना परळीच्या उड्डाण पुलावरुन 'नो एण्ट्री' !
परळीत यायचंय तर पर्यायी रस्ते शोधा
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंगस्थान असलेल्या परळी वैजनाथ शहरात प्रवेश करायचा झाल्यास डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल ओलांडल्याशिवाय गत्यंतरच नाही. मात्र आता तब्बल एक महिना परळी शहरातील मुख्य प्रवेशद्वारावरुन तुम्हाला वाहन घेऊन एन्ट्री करता येणार नाही. परळी शहरात यायचेच असेल तर परळी शहराच्या बाजूचे पर्यायी रस्ते व बायपास रस्त्याचा उपयोग करावा लागणार आहे. डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतीच जारी केली आहे.
परळी वैजनाथ शहरातील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची दुरुस्ती करण्याकरिता पुलावरील वाहतूक एक महिना चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत उपविभागीय अभियंता, रा. म. उपविभाग लातूर यांनी जा.क्र.रा.म.उ. बि.ला/तां. शा/२०२/२०२५ दि.२९/ ०४/२०२५पत्र निर्गमित केले आहे. संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने परळी वैजनाथ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब वरील डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची तांत्रिक दुरावस्था लक्षात घेता त्या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामास अडथळा येऊ नये व वाहतुकीतील अपघाताचा धोका टाळण्यासाठी पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक दि.२६/०५/ २०२५ पासून दि. ३०/०६/२०२५ पर्यंत कालावधीत बंद ठेवावी लागणार आहे. वाहतूकीसाठी परळी बायपास हाच पर्यायी मार्ग राहणार आहे.
त्यामुळे दि.२६/०५/२०२५ पासून दि. ३०/०६/२०२५ पर्यंत वाहतूक बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन श.म. उरगूंडे (उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर) यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा