शुक्रवारी रक्तदान शिबीर !
श्रीशनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न, अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायण सोहळ्यास सुरुवात
परळी वैजनाथ दि.२० (प्रतिनिधी)
भजनाच्या तालावर पावले खेळत चालणाऱ्या, एकाच रंगाच्या आकर्षक साड्या घालून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या तसेच मंगल कलश मस्तकी धारण केलेल्या, हाती भगवा निशाण फडकावत मुखी गुरुराज माऊलीचा गजर करणाऱ्या महिला भगिनी आणि पांढऱ्या शुभ्र पोशाखात जय शनैश्वर घ्या टोप्या परिधान केलेल्या व दोन-दोनच्या रांगेत शिस्तीने चालणाऱ्या पुरुषांनीही सोमवारी (ता.१९) श्री शनैश्वर जन्मोत्सव आणि अखंड शिवनाम सप्ताह निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेची शोभा वाढवली.
येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी श्री.शनैश्वर मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जन्मोत्सव साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षापासून शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.. या शोभा यात्रेची सुरुवात मोंढा मैदानातील हनुमान मंदिरापासून झाली. नियोजनानुसार महिला भगिनींनी भगव्या पताका, मंगल कलश, एकाच रंगाच्या साड्या तसेच शाळकरी मुला-मुलींनी विविध संतांच्या केलेल्या वेशभूषा तर पुरुष मंडळींनी पांढराशुभ्र पोशाख व जय शनैश्वर घ्या टोप्या परिधान केलेल्या आणि शिस्तीत गुरुराज माऊलीचा जयघोष करत या शोभायात्रेत सहभाग घेतला. श्री हनुमान मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा राणी लक्ष्मीबाई टाँवर मार्गे श्री शनि मंदिरात पोहोचली. राणी लक्ष्मीबाई टावर जवळ आणि तळ भागात येताच या शोभायात्रेचे स्वागत आकर्षक फटाके वाजवून करण्यात आले. वैद्यनाथ मंदिराच्या प्रांगणात श्री शनी मंदिर समोर शोभा यात्रेचे आगमन झाल्यानंतर महिला भगिनींनी सुंदर रिंगण करून टाळ, मृदंग आणि ढोल ताशाच्या तालावर गुरुराज माऊलीचा जयघोष केला. ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी तेली समाजाच्या तरुण मंडळी, शनी भक्त, महिला मंडळ, ज्येष्ठ मंडळींनीही प्रयत्न केला. यावेळी राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौकात भाजपच्या वतीने शहराध्यक्षा उमा समशेट्टे, महादेव ईटके, नितीन समशेट्टे, अश्विन मोगरकर, विकास हालगे, सुशील हरंगुळे तर शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे,शहर प्रमुख वैजनाथ माने, संतोष चौधरी, मोहन राजमाने, अनिल शिंदे सुदर्शन यादव, गोविंद गरड, कृष्णा पौळ आदिंनी स्वागत केले.तर नगरसेवक जयराज देशमुख यांच्या वतीने शोभायात्रेत सहभागी भक्तांना थंडपेयाचे वाटप व नेहरु चौकात शोभायात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीनी स्वागत करण्यात आले.
---------------------------------------------------
अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायणाची सुरुवात
शुक्रवारी शोभायात्रेनंतर अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्यास मंगळवारी (ता.२०) सुरुवात करण्यात आली. पारायणास महिला व पुरुष भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हे पुढील सात दिवस चालणार आहे.
---------------------------------------------------
दरम्यान श्री.शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्यात गेल्या १५ वर्षांपासून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. शिबीर आयोजनाबद्ल स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रक्तपेढी च्या वतीने अनेकवेळा सन्मानित केले आहे. यंदाही रक्तदान शिबीराचे आयोजन शुक्रवारी (ता.२३) सकाळी ८ ते १२ यावेळेत श्री शनी मंदिरात करण्यात आले आहे.शिबीरात सहभागी होवून युवकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
--------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा