राजकीय वर्तुळात शोककळा !!!

प्रवासात  लातूर -तुळजापूर- सोलापूर रस्त्यावर गाडीचा भीषण अपघात: माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. जिजा देशमुख यांच्या गाडीला आज दुपारी  प्रवासादरम्यान लातूर -तुळजापूर- सोलापूर रस्त्यावरील बेलकुंड जि.धाराशिव  गावाजवळ भीषण अपघात झाला.या आपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

      माजी आमदार आर टी देशमुख हे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी होते. वैद्यनाथ कारखान्यात सुरुवातीपासूनच ते संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची उल्लेखनीय कारकीर्द ठरलेली आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहत त्यांनी आजतागायत पंकजा मुंडे यांच्यासाठीच पक्षात काम केले. माजलगाव मतदार संघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या वातावरणात त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. पाच वर्षे त्यांनी माजलगाव मतदार संघाचे लोकप्रतिनिधित्व केले. अतिशय सोज्वळ, सुसंस्कारी, संयमी आणि खंबीर नेता अशी त्यांची कायमच प्रतिमा परळी सह बीड जिल्ह्यात राहिलेली आहे. माजी आमदार आर टी देशमुख हे लातूर -तुळजापूर- सोलापूर मार्गावरील बेलकुंड जवळ असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की गाडीचा चकनाचूर झालेला आहे. या अपघातात गंभीर जखमी अवस्थेत त्यांना लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. आर टी देशमुख यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक संवेदना व्यक्त केली जात आहे.

पंकजा मुंडेंनी सर्व कार्यक्रम रद्द करत गाठले लातूर

      दरम्यान राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात असतानाच त्यांना ही माहिती कळाली. त्यानंतर तातडीने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत नांदेडहून लातूरकडे प्रस्थान केले. आर टी देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला. तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. किनीकर यांच्याशीही संवाद साधून माहिती घेतली. पंकजा मुंडे या तातडीने लातूर येथे पोहोचल्या आहेत.


औसा रोडवर हृदयद्रावक घटना

       माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि जनमानसात 'जीजा' या नावाने लोकप्रिय असलेले आदरणीय आर. टी. जीजा देशमुख (वय अंदाजे ७०) यांचे बेलकुंड, ता. औसा, जि. लातूर जवळ भीषण अपघातात निधन झाले आहे. या हृदयद्रावक घटनेने बीड आणि लातूर जिल्ह्यासह संपूर्ण माजलगाव मतदारसंघात शोककळा पसरली असुन, राजकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.देशमुख हे आपल्या गाडीने (गाडी क्रमांक एमएच ४४ एडी २७९७) प्रवास करत असताना बेलकुंड गावाजवळ औसा रोडवर त्यांच्या गाडीला आज दिनांक 26 मे रोजी दुपारी भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, गाडीचे मोठे नुकसान झाले.  देशमुख यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वसामान्यांशी नाळ... 

आर. टी. जीजा देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार होते. त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते. सर्वसामान्यांशी त्यांचे थेट आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. जनतेच्या सुख-दुःखात ते नेहमीच सहभागी होत असत, त्यामुळे 'जीजा' या नावाने ते जनमानसात प्रिय होते. त्यांच्या निधनाने माजलगावची मोठी हानी झाली असून, एक तळमळीचा आणि जनतेच्या हितासाठी झटणारा नेता हरपल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार