“संवेदनशील विषयांवर जबाबदारीने बातम्या द्या”
843 ऊसतोड महिलांच्या गर्भाशय काढल्याची बातमी अर्धसत्य - आ.चित्रा वाघ
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोडणी कामगार महिलांची गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बातमी काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून व समाजमाध्यमांतून वेगाने पसरत आहे. मात्र ही माहिती अर्धसत्य असून दिशाभूल करणारी असल्याचा दावा भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी केला आहे.
“एक स्त्री म्हणूनही ही बातमी मला खोलवर जिव्हारी लागली. पण सत्य शोधताना लक्षात आलं की ही माहिती पूर्णपणे तथ्याधारित नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.
शासनाने 2019 पासून कडक नियम लागू केले
चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं की, शासनाने 2019 पासून ऊसतोडणी महिला कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही नियम आखले असून आता कोणत्याही महिलेचे गर्भाशय फक्त वैद्यकीय गरज असल्यासच, आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पूर्वपरवानगीनेच काढले जाते.
843 पैकी 576 शस्त्रक्रिया 2019 पूर्वीच्या
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
- 267 शस्त्रक्रिया 2019 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत बीड जिल्हा रुग्णालयात झाल्या असून त्या सर्व वैद्यकीय गरजेनुसार, तपासणीनंतर, अधिकृत परवानगीने करण्यात आल्या आहेत.
- उर्वरित 576 शस्त्रक्रिया या 2019 पूर्वी झालेल्या असून, त्या काळात संबंधित नियम अस्तित्वात नव्हते.
“संवेदनशील विषयांवर जबाबदारीने बातम्या द्या” — वाघ यांचे माध्यमांना आवाहन
महिलांचे आरोग्य हा अत्यंत नाजूक विषय आहे. त्यामुळे समाजामध्ये भीती व गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या देताना माध्यमांनी जबाबदारीने आणि तथ्य तपासूनच माहिती द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
“माझं माध्यमांना विनम्र आवाहन आहे — महिला आणि आरोग्य यांसारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना कृपया पूर्ण शहानिशा करा. गैरसमज आणि भीती पसरवू नका,” असंही त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा