इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

अनुभूती वारीची.....!✍️ संतोष कुलकर्णी

 वारीची नादमय झुळूक – परळी ते अंबाजोगाई

पहाटे पाच वाजता परळी मधून श्री गजानन महाराजांची पालखी अर्थात दिंडी अंबाजोगाईच्या दिशेने मार्गक्रमण करणार होती.आम्ही सगळे पहाटे परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा मंदिराच्या प्रांगणामध्ये जमा झालो होतो.शहरातील हजारो महिला भगिनी ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष करत होते.पालखी अंबाजोगाई च्या दिशेने रवाना होण्याचा क्षण म्हणजे नव्या मुक्कामाच्या दिशेने पडलेले पाऊल.........परळी ते अंबाजोगाई हा 24 किलोमीटरचा प्रवास कसा होणार. हे सुरुवातीला मला वाटत होते.परंतु वारकरी बंधू-भगिनींच्या समवेत हा घाट चढून जाताना शहरात कधी पोहोचलो हे कळालेच नाही.

परळी शहरालगत असणाऱ्या बालाघाट डोंगरांच्या घाटातून उतरती होती ती एक केवळ यात्रा नव्हे… ती होती एका विश्वासाची, भक्तीची, परंपरेची आणि नादमयतेची नदी ! परळीच्या उंच टेकाडांवरून जेव्हा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची दिंडी अंबाजोगाईच्या दिशेने मार्गक्रमण करत होती, तेव्हा अवघं वातावरणच भारलेलं होतं.दररोजच्या संसारातील ,ताणतणाव कधीच विसरून गेले होते.ऐकू येत होता फक्त श्री गजाननाचा जयघोष.या वारीमध्ये मी तादात्म्य होणं काय असतं हे अनुभवलं


टाळ, मृदुंग, अभंग, हरिनामाचा गजर – या प्रत्येक तालात एक लयबद्ध नाद होता, जो थेट अंतःकरणाला स्पर्श करत होता. पावलं पुढे चालत होती, पण मन जणू विठ्ठलाच्या चरणी टेकलेलं. “ज्ञानोबा-तुकाराम!” चा गजर हृदयातून निघत होता आणि आकाशाच्या कुशीत विलीन होत होता.


एका बाजूला घाटाच्या वळणांवरून सूर्याची किरणं पांथस्थांच्या गालांवर पडत होती, तर दुसरीकडे, गावाच्या वाटांमध्ये उभ्या असलेल्या लहानग्या लेकरांच्या डोळ्यांमध्ये कुतूहल आणि आनंद चमकत होता. कुणी टाळ वाजवत होतं, कुणी अभंग म्हणत होतं, तर कुणी निवांतपणे महाराजांच्या पालखीच्या दर्शनात रमत होतं.


ही वारी म्हणजे केवळ चालणं नव्हतं, ती होती एक सांघिक साधना – भक्तीची, सामूहिकतेची, समरसतेची. गावकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा पाणी, फळं, पन्हं घेऊन उभं राहणं हीसुद्धा एक अनाम सेवा होती. कुणाचं नाव नाही, पण कार्य पवित्र होतं.


सारं काही विसरायला लावणारी ही ऊर्जा होती – जिच्यात कुणी वृद्धाच्या काठ्यांना बळ देत होतं, कुणी लहानग्यांच्या हाताला धरून चालत होतं. आणि या साऱ्याच्या पाठीशी एक न सांगता येणारी ओढ होती – भगवंताच्या, संतांच्या, आणि ‘आपण सर्व एक आहोत’ या जाणिवेची.


वारीचं हे दृश्य म्हणजे जणू भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ यांचं एका क्षणात एकत्रित होणं होतं. आजच्या धकाधकीच्या जगात काही क्षण असे येतात, जेव्हा सारा गोंगाट विरतो, आणि उरतो तो फक्त एक नाद – हरिनामाचा, प्रेमाचा, भक्तीचा.


वारी संपते, पण ती जी भावना उरते ती आयुष्यभर साथ देणारी असते. कारण ती चाललेली असते बाहेरून जरी वाटतं, तरी प्रत्यक्षात ती चाललेली असते अंतर्मनाच्या वाटेवर.

जय गजानन महाराज! जय हरि विठ्ठल!

✍️ संतोष कुलकर्णी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या