सिंगल युज प्लास्टिकचा भस्मासूर रोखायलाच हवा अन्यथा परिस्थिती गंभीर ; ना. पंकजा मुंडे यांची परळीत जनजागृती मोहीम
वैद्यनाथ मंदिरात कापडी पिशवी वेडिंग मशीनचे उदघाटन; आनंदधाम येथे वृक्षारोपण तर मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम
नागरिकांनी जास्तीत जास्त कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे केले आवाहन
परळी वैजनाथ।दिनांक ०२।
पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळेच पर्यावरणाला घातक असणाऱ्या एकल प्लास्टिक वापराचा भस्मासूर आपल्याला रोखायलाच हवा, यासाठी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक उपयोग करावा त्याचबरोबर आपला परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी कचरामुक्त परिसरावरही लक्ष केंद्रित करून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशा वृक्षारोपणाकडेही प्रत्येकाने लक्ष द्यावे. एवढेच नाही तर एक झाड आई-वडिलांसाठी तर एक झाड हे आपल्या सृष्टीमातेसाठी लावावे आणि त्याचे संवर्धन करावे असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे आज केले.
शहरातील आनंदधाम येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण, पर्यावरण विभाग व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यनाथ मंदिरात 'नो प्लास्टिक' उपक्रमा अंतर्गत कापडी पिशवी मशीनचे उदघाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वैद्यनाथ देवल कमिटीचे राजेश देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तापा इटके, शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे, उप जिल्हाधिकारी अरविंद लाठकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगरपरिषद मुख्याधिकारी कांबळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुरमूडे आदी उपस्थित होते.मंदिर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभही पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक वृक्ष माॅ के नाम' हा उपक्रम जाहीर केला आहे. यामध्ये एक आपली आई जीने आपल्याला जन्म दिला तिच्यासाठी एक वृक्ष व दुसरी आपली आई म्हणजे ही सृष्टी तिच्या संवर्धनासाठी एक वृक्ष लावला पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. वृक्षारोपणाचे कार्यक्रम केवळ राजकीय स्वरूपात करू नका. फोटो पुरते करू नका. तर ते वृक्ष जगवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा असे आवाहन पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले.
प्लास्टिकमुक्तीचा दृढ संकल्प करा आणि कचरामुक्तीची कास धरा !
--------------------
सध्या पर्यावरण विभागाच्या वतीने अधिकाधिक प्लास्टिक मुक्तीवर भर दिला जात आहे. या दृष्टीने सर्व ते प्रयत्न केले जात असुन प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला पाहिजे. यापुढे एकल प्लास्टिक वापरावर बंधने आणून अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये ही जाणीव जागृती निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असुन सर्व देवालयांशी व देवस्थानांशी बोलून याबाबत आपण पुढचे पाऊल टाकणार आहोत. नागरिकांनी अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करावा त्यासाठी घरातील पिशवी आणावी किंवा आपण ठिकठिकाणी कापडी पिशव्यांचे मशीन बसवणार आहोत याचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले.
लोकसहभाग महत्वाचा
----------------
पर्यावरण संवर्धनाचे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत मात्र हे केवळ प्रशासकीय पातळीवरच मर्यादित राहू नयेत यासाठी जास्तीत जास्त लोकसहभागातून हे उपक्रम यशस्वी होतील.यासाठी लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची माझ्यापासून सुरुवात करणार असुन यापुढे माझ्या परळीतील यश:श्री व मुंबईतील रामटेक या शासकीय निवासस्थानी जे अभ्यागत मला भेटायला येतील त्यांनी प्लास्टिक पिशव्या मधून आणलेले बुके आणू नयेत. एवढेच नाही तर मला भेटायला येणाऱ्यांनी हातात प्लास्टिक पिशव्या घेऊन बुके,हारतुरे आदी आणले तर त्यांना प्रवेश बंदी केली जाईल. अधिकाधिक प्लास्टिक मुक्तीसाठी आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण प्लास्टिक मुक्तीची व स्वच्छतेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे असेही पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केले.
मध्यप्रदेशातील स्वच्छतेसारखे आपले राज्यही स्वच्छ करुया
---------------------
मध्य प्रदेशातील स्वच्छता जर बघितली तर ती खरोखरच कौतुकास्पद आहे. मध्य प्रदेशातील स्वच्छतेचे कौतुकच केले पाहिजे. परंतु महाराष्ट्रात मात्र अशा पद्धतीची स्थिती सध्या तरी नाही हे चिंताजनक आहे. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी जबाबदारीपुर्वक काम करावे त्याबरोबरच नागरिकांनीही स्वच्छतेच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात प्लास्टिक मुक्त आणि कचरा मुक्त परिसर यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आपल्याकडे याबाबतीत नागरिकांनी जबाबदारीने या गोष्टीचे तंतोतंत पालन केले तर काही दिवसातच आपले महाराष्ट्र राज्य ही स्वच्छ व सुंदर परिसराचे होईल यात काहीही शंका नाही. सध्या पर्यावरण विभागाच्या वतीने अधिकाधिक भर दिला जात आहे. या दृष्टीने सर्व ते प्रयत्न केले जात असुन प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला पाहिजे असेही आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले.
राज्यभरातील मंदिरांशी चर्चा करणार
---------------‐------
राज्यभरातील मंदिरांशी चर्चा करुन कापडी पिशव्या वापरण्याचा आग्रह धरण्यात येणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत या मंदिरांमधून सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी व्हावा त्याऐवजी कापडी पिशव्या वापरल्या जाव्यात याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत अनेक संस्थांशी पत्रव्यवहार देखील केला आहे. त्या दिशेने काम करत असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा