माऊली महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक
चाकरवाडीतील शिवमहापुराण कथेला ना. पंकजा मुंडेंची भेट ; कथा श्रवणासोबत आरतीत घेतला सहभाग
माऊली महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक
केज ।।दिनांक ०८।
विसाव्या शतकातील महान संत, ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त चाकरवाडीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा सोहळ्याला आज प्रारंभ झाला. या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित राहून दर्शन, कथाश्रवण व शिवमहापुराण कथेच्या आरतीत सहभाग घेतला.
ना.पंकजाताई मुंडे यांनी या दिव्य सोहळ्याला भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले, तसेच पं. प्रदीप मिश्रा यांच्या प्रभावी शैलीतील शिवमहापुराण कथेतील आरतीत सहभागी होत, हजारो भाविकांबरोबर भक्तिभावाने या वातावरणात रममाण झाल्या.या वेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी पंकजाताईंचे या सोहळ्यात औपचारिक स्वागत केले. २० व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर महाराजांच्या विचारांचे स्मरण करताना पंकजाताईंनी सांगितले की, बीड जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माऊलींनी सामाजिक आणि अध्यात्मिक परिवर्तनाचा जो मार्ग दाखवला, तो आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांच्या कार्यामुळे समाजाला दिशा मिळाली आणि एकात्मतेचा संदेश पसरला.ही श्रद्धा आणि भक्ती हीच आपल्या संतपरंपरेची खरी ताकद आहे. अशा सोहळ्यांमधूनच समाजाला सकारात्मकता आणि एकोप्याचा संदेश मिळतो असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.
शिवमहापुराण कथेचे कथाव्यास पं. प्रदीप मिश्रा यांचे दर्शन घेऊन पंकजाताई मुंडे यांनी आरतीमध्ये सहभाग घेतला.या कार्यक्रमास हजारो भाविक उपस्थित होते.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा