आषाढी वारी परळीत येणार्या दिंड्या : वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय:उपविभागीय अधिकाऱ्यांचा केला सत्कार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –
यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त पंचम ज्योतिर्लिंग श्री वैजनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या संतांच्या पालख्यांना अडथळा येऊ नये म्हणून परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम तात्पुरते थांबवण्याचा सकारात्मक निर्णय घेणाऱ्या उपविभागीय अधिकारी श्री. अरविंद लाटकर यांचा आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उड्डाणपुलाचे काम दिनांक 26 मे 2025 पासून सुरू करण्यात आले होते. हे काम पालखी मार्गावरच असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते व माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती.
उपविभागीय अधिकारी श्री. लाटकर यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत नगरपरिषद परळी येथे विशेष बैठक घेऊन काम तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संत पालख्या निर्धारित मार्गावरून कोणताही अडथळा न होता श्री वैजनाथ दर्शनासाठी पोहोचू शकतील, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
या निर्णयाबद्दल शिवसेनेच्या वतीने श्री. लाटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना युवा नेते प्रा. अतुल दुबे, वैजनाथ माने, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, युवासेना माजी उप जिल्हाप्रमुख मोहन परदेशी, शहर संघटक संजय कुकडे, सुधाकर वाघमारे, कारभारी शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "जनहिताच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेला हा निर्णय प्रशंसनीय असून, भविष्यातही असेच सहकार्य मिळावे हीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा