बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
अमरावती : शेतकरी कर्जमाफीसह अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावतीत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. बच्चू कडू यांच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज विष प्राषाण करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं होतं. तर काही आंदोलकांनी थेट तहसीलदारांना अडवल्याचा प्रकार बघायला मिळाला होता. यानंतर अखेर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत बातचित करुन दिली.
मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला. शेतकरी कर्जमाफीसाठी आपण समिती नेमू. त्या समितीचा अहवाल समोर आल्यावर त्याबाबत निर्णय घेऊ आणि या समितीत स्वत: बच्चू कडू यांना घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना फोनवर दिलं. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
"सरकार सकारात्मक काम करत आहे, बच्चू कडू यांचं समाधान होत नाही तोपर्यंत बैठका होतील, तोपर्यंत बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आक्रमक न होण्याचं आवाहन करावं", अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. "उद्या आपला निर्णय होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं आंदोलन करु नका", असं आवाहन बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासना नंतरही बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेतलं नाही. आज रात्री सर्व आंदोलकां सोबत चर्चा करुन उद्या याबाबत निर्णय घेऊ, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
■ _ परळीत सुनेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ;गुन्हा दाखल_
■ _शिवमहापुराण कथेसाठी चाकरवाडीला गेलेला बत्तीस वर्षीय इसम बेपत्ता_
■ _शिवमहापुराण कथेला चाकरवाडीला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिन्याची चोरी_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा