३ जुन स्मृतीदिन कार्यक्रमाचे प्लास्टिक मुक्त आयोजन
'स्वयंसिद्धा' पंकजाताई- गोपीनाथगडावर 'नो प्लास्टिक' !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज ३ जून रोजी गोपीनाथ गडावर पारंपारिक पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी कीर्तन व महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप असुन गोपीनाथ गडावरील सर्व कार्यक्रम हे 'नो प्लास्टिक" या पद्धतीने असणार आहेत. गोपीनाथ गडावर प्लास्टिक मुक्त कार्यक्रम करण्यात येणार आहे.
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पर्यावरण पूरक उपक्रम व प्लास्टिकमुक्ती बाबत मोठी चळवळ महाराष्ट्रात उभी केली आहे. या अनुषंगानेच याची स्वतःही अंमलबजावणी करतांना त्या दिसत आहेत.त्यांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रम संपुर्णत: पर्यावरणपूरक आयोजित केला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सर्वांनाच एका व्हिडिओद्वारे पंकजाताई मुंडे यांनी निमंत्रण दिले असुन हा गोपीनाथ मुंडे परिवाराचा कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर राज्याच्या पर्यावरण मंत्री म्हणून जबाबदारीपूर्वक आणि महाराष्ट्रात उभ्या केल्या जाणाऱ्या पर्यावरण विषयक जनजागृती, प्लास्टिकमुक्ती प्रदूषणमुक्ती आदी चळवळीच्या अनुषंगाने त्यांनी स्वतःही याबाबतची अंमलबजावणी सुरू केली आहे.
आपल्या समर्थक, कार्यकर्त्यांना व नागरिकांना त्यांनी सातत्याने प्लास्टिकमुक्ती बाबत आवाहान केलेले आहे. या चळवळीत लोकसहभाग हवा या दृष्टिकोनातून मला हारतुरे देण्याऐवजी 11 कापडी बॅग आणून द्या अशा प्रकारचे आवाहन केलेले आहे. त्याचबरोबर यश:श्री व रामटेक या निवासस्थानी मला भेटायला येत असताना प्लास्टिकच्या पिशव्यांमधून बुके व हारतुरे आणू नका अशा प्रकारची स्वतःपासून अंमलबजावणीची सुरुवात त्यांनी केली आहे. अशाच प्रकारचा एक उपक्रम गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमातही अंमलात आणला असुन गोपीनाथगडावर संपूर्णतः प्लास्टिकबंदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे.
गोपीनाथगडावर लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहतो. या ठिकाणी उपस्थित जनसमुदायाच्या महाप्रसादाची ही व्यवस्था असते. या अनुषंगाने कोणतेही साहित्य प्लास्टिकचे असू नये याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात संपूर्णतः प्लास्टिकमुक्तीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा