अध्यात्मिक संशोधनातून सरस्वती नदीची माहिती काय ?

कांतीपुरीची ऐतिहासिक कथा: परळी वैजनाथ येथील प्राचीन "पुण्यसलीला सरस्वती" नदी !




श्रद्धा आणि अश्रद्धा, स्वीकार आणि नकार, वाचन, मनन चिंतन किंवा नुसतेच वाक् ताडन यांच्या हिंदोळ्यावर झुलनारे सरस्वतीचे आदिम अस्तित्व न्याहाळत असतांना पुरातत्त्वशास्त्र या अभ्यासविषयामुळे सर्वसामान्यांपासून अज्ञात असलेले सरस्वतीचे अनेक संदर्भही नजरेसमोर येत गेले. आणि या विषयावर सर्वसामान्य वाचकांसाठी काही लिहावे हा विचार दृढ होत गेला. संशोधनाच्या क्षेत्रात अंतीम आणि चिरंतन असं काही नसतंच. संशोधनातून समोर येणाऱ्या सत्यास वस्तुनिष्ठपणे तोलून स्वीकारणे एवढेच आपण करू शकतो.कारण धारणांचे धागे फार अदृश्य असतात.

मुळात सरस्वती ही एक नदी प्रबळ सप्तसरितापैकी एक. प्राचीन. मानवसमूहास ती उपकारक ठरली म्हणून त्यांनी तिच्या स्तुतीपर ऋचा रचल्यात. त्यातून ती एक नदीदेवता झाली. नदी म्हणजे लोकमाताच. म्हणून नदीतमें-अंबीतमे - देवीतमे असा तिचा प्रवास होत गेला. 


सरस्वती हे नाव उच्चारताच भारतीय माणसाच्या मनःचक्षूसमोर सर्वप्रथम उभी राहते ते एका विद्येची देवता मानली जाणाऱ्या देवतेचे रूप. आणखी थोडे खोलात शिरल्यास हे नाव भारतातील एका पवित्र मानल्या गेलेल्या नदीचे आहे हे ही त्यांच्या लक्षात येते. नदी आणि देवता, देवता आणि नदी या दोन मुख्य स्रोतांजवळच सरस्वती या स्त्रीवाचक नामातील वाच्यार्थाचा शोध येऊन थांबतो. पण त्यातील अर्थाचा शोध घेण्यासाठी आपणास बरेच अंतरंगात शिरावे लागते.

            ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलात ऋषी गृत्समद यांचे एक सरस्वती स्तोत्र आहे. यात एकूण तीन ऋचा आहेत. यापैकी एक ऋचा आपण यापूर्वी पाहिली, तथापि येथे सर्व स्तोत्राचा एकत्वाने विचार करू. कारण त्यात देवीची नदी, माता व देवता या तिन्ही रूपांनी आराधना केलेली आहे.


अम्बितमे नदीतने देवितमे सरस्वती । अग्रशस्ता इवस्मसि प्रशस्तिमध्व नस्कृधि ।। ते विश्वा सरस्वती श्रितांयुषिदेत्याम। शुनहोत्रेषु मत्स्वं प्रजां देवि दिदिऽ दिनः ।। इमा ब्रह्म सरस्वति जुषस्व वाजिनीवति । या ते मन्म गृत्समदा ऋतावरि प्रिया देवषु जुहति ।।


हे नदीमध्ये, मातांमध्ये आणि देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा सरस्वती माते, आम्ही अज्ञानी बालकांप्रमाणे आहोत. आम्हाला उत्तम ज्ञान प्रदान कर.


हे माते सरस्वती, तुझ्या तेजस्वी आश्रयावरच जीवनाचे सुख आश्रीत आहे. म्हणून माते, पवित्र करणाऱ्या या यज्ञाने आनंदित होऊन आम्हास उत्तम संतती प्रदान कर. हे माते, तू आम्हास अन्न आणि बल प्रदान करून सत्यमार्गावर चालविणारी आहेस देवांना प्रिय असणाऱ्या गृत्समद ऋषीद्वारे निर्माण स्तोत्रांना आम्ही तुला ऐकवित आहोत. या स्त्रोतांचा स्वीकार करावा.

सरस्वती नदीचे आख्यान

चुली नावाचा ब्राह्मण धर्म आरण्यामध्ये तपश्चर्या करीत होता. तपाच्या प्रभावाने इंद्र पद दोलायमान झाले. इंद्राने तारा नावाची अप्सरा व मदन या दोघांना चुलीचे तप भ्रष्ट करण्यासाठी पाठवले.तारा अप्सरेच्या सौंदर्यावर  चुली नावाचा ब्राह्मण भाळला. तारेचा उपभोग घेतला. एके दिवशी तारा स्वर्गाला निघाली असता विरहाने कामज्वर पेटला. चुलीचे रेत स्लखन झाले.वायु ने वावटळीने रेत उडवले. ते कांतीपुरी नगरीतील चक्रतीर्थात येऊन पडले. कमल कोशात रेत पडल्याच्या नंतर त्यातून एक तेजस्वी बालक वाढीस लागले.


"बहु त्वरेने तारा जाता ।। रेत स्खलन मुनीचे होता ।। तिकडून वायु वहाटूळ येता ।। उडविले रेता तयाने ।। ९१ ।। मग वायूवेगे ते रेता ।। उडून आले

कांतीपुरीत ।। चक्रेतीर्थी झाले पडता ।। झाला तशांत चमत्कार ।। ९२ ।। कमल कोशात रेत पडे ।। दैव योगे ते थोर वाढे ।।। ते गाढोनी कोशात झाले गाढे ।। शरीर वाढे कोशांतरी ।। ९३ ।। तया पद्म कमलातून ।। होता झाला पुरुष घन ।। सूर्यापरी जयाचे किरण ।। अंगी बाळासे मुसमुसीत ।। ९४ 

तेव्हा तेथे हंसारूढ ब्रम्ह कन्या सरस्वती चक्रतीर्थात स्नानास आली.ते बाळ उचलून घेतले .तो सरस्वती चे हस्त स्पर्शाचा म्हणून "सारस्वत"नाव ठेवले.

"सरस्वतीचा सुत ।। म्हणूनी नांवे सारस्वत ।। प्रख्यात होईल जगत्रया ।। ब्रह्म दोघाते वरदेती ।।"

कालांतराने दुष्काळ पडल्यामुळे सरस्वती मातेला दया आली.सारस्वत बाळासाठी कुप निर्माण केला.कधीच दुष्काळ पडणार नाही.असा आर्शीवाद दिला.

"एक कुप ते निर्मिला ।। तेथून वाहे जे जळ झुळझुळा ।। म्हणे मी कुप हा निर्मिला ।। सकळ काम फळा पुरविला ।। ४० ।। "

या कुपातूनच पाण्याचा प्रवाह झुळझुळा वाहत तीच सरस्वती या नावाने पावन पवित्र नदी परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे पुढून वाहत आहे.

        पौराणिक संदर्भ असलेल्या या कांतीपुरी नगरीतील सरस्वती नदीला नगरपालिका प्रशासनाने व काही राजकीय कार्यकर्ते व माजी नगराध्यक्षांनी 'नाला'संबोधिले आहे.वास्तविक भारतातील कोणतीही नदी पवित्र न ठेवता त्यात प्रदुषित करण्याचे पाप जनतेसह प्रशासनाने केले आहे.याला अपवाद परळीतील सरस्वती तरी कशी राहील.

           गंगा आणि यमुना हे भारतातील दोन महान जलप्रवाह. त्यांचा संगम प्रयागराज इथे होतो. अर्थात प्रयाग म्हणजेच संगम. सर्व तीर्थांत श्रेष्ठ तीर्थ, श्रेष्ठ संगम स्थळ म्हणजे प्रयागराज अशी भारतीयांची मान्यता. त्या संगमस्थळी स्नान केल्याने पापक्षय होऊन पुण्य लाभते असा हिंदू धर्मीयांचा विश्वास. पण या दोन नद्यांच्या संगमाला प्राचीनकाळापासून त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जाते. गंगा, यमुना या दोन वेणा दृष्य स्वरूपात समोर उभ्या, पण संगम मात्र त्रिवेणी. मग तिसरी वेणा (नदी-प्रवाह) कोणती? तर ती म्हणजे सरस्वती. ती या ठिकाणी अदृष्य स्वरूपात वाहते आहे. दिसत नसली तरी तिचे अस्तित्त्व मात्र आहे हा दृढ विश्वास. म्हणून हा संगम त्रिवेणी संगम म्हणूनच सर्व जगात विख्यात आहे.

याचप्रमाणे परळी नगरीतील ब्रम्ह गंगा व गणसिद्धी या दोन्ही मधील तिसरा प्रवाह म्हणजेच सरस्वती नदी होय.येथेही त्रिवेणी आहे.

परळी वैजनाथ येथील एका माजी नगराध्यक्षांनी फेसबुक पोस्ट टाकली म्हणे की,सदरहू सरस्वती नदी नव्हे तर तो नाला आहे.सरस्वती नदी म्हणून कशाला अपमानित करता!नदीत पद प्रक्षालन कधी केले?असे उपरोधिक सवाल केले.पत्रकारांवर पण बोलले.मला वाटत धर्मात अधिकार महत्त्वाचाच ठरतो.अधिकारी व अनधिकारी यांचा विचार होतोच.जर अधिकार नसेल तर आडनावाने धर्माधिकारी ठरु शकतात.त्याबाबतीत दुमत असण्याचा प्रश्नच येत नाही.परंतु वैयक्तिक लाभ व हानी पेक्षा धार्मिक व पौराणिक संदर्भ असलेल्या सरस्वती नदीचे अस्तित्व नाकारून त्याला नाला म्हणणे संयुक्तिक नाही.

मी स्वतः पदप्रक्षालन करून अंबेवेशीतील शनी मंदिराजवळून सरस्वती नदीचे पाण्यातून वैद्यनाथ मंदिराचे दर्शन साठी गेल्याचे अजूनही स्मरण आहे.तुमचा जन्मच माझ्या नंतरच निश्चितच आहे. पूर्वी सरस्वती नदीच्या पात्रातून शनी मंदिराजवळून जाण्यासाठी एकमेव अंबेवेशीतूनच रस्ता होता. पुरातन परळीचा इतिहास पाहता आंबेवेशीतील सरस्वती नदी चे  पूर्वेला आणि गणसिद्धी नदीच्या मध्ये वसलेले होते. आजही जुनं गाव म्हटलं की गणेश पार भाग तसेच काल रात्री आणि नांदूरवेस, उखळवेस हाच भाग प्राचीन समजला जातो .माझ्या लहानपणी गोपाळ टाॅकीज उभारल्यापासून परळीचा विस्तार झाला. थर्मल पावर स्टेशन मुळे व रेल्वे स्टेशन मुळे परळीचा विस्तार पावलेला आहे.

परळीला सुप्रसिद्ध अशा तीनवेसी होत्या. एक घाटनांदुरकडे जाणारी नांदूर वेस, उखळी कडे जाणारी उखळवेस आणि आंबेजोगाई कडे जाणारी आंबे वेस या तिन्ही वेशी मध्ये जुना गाव भाग होता. अंबेवेशीतून शनी मंदिराकडे जायचा रस्त्यावर उंच अशा तीन शिळा रस्त्यामध्ये रोवलेल्या होत्या. त्यातून जाण्या-येण्याचा रस्ता होता .पूर्वी बाजारहाट शनी मंदिर ते टिंबे गणपती या रस्त्यावरच भरला जायचा. त्यात भाजीपाला व पशु पक्षी व प्राण्यांचा ,बैलांचा बाजार असे. गणेशपार ते नांदूरवेश या रोडवर दोन्ही बाजूने किराणा व आडत दुकाने बाजारपेठ होती. या बाजारपेठेच्या अस्तित्वाच्या खुणा व साक्षीदार काही जुनी मंडळी आहेत. 

परळीतील सार्वजनिक स्मशान भूमी ही मार्कंडे तीर्था जवळ असून या स्मशानभूमीच्या लगतच पवित्र अशी सरस्वती नदी वाहत आहे. स्मशान भूमीत अंत्यविधी क्रिया झाल्यानंतर पदप्रक्षालन केले जात असे. म्हणून आज जरी सरस्वती नदीला नाला ठरवून त्याचे पावित्र्य व अस्तित्व मिटवण्याचा, वैयक्तिक लाभ हानीचा विचार करून काही राजकीय कार्यकर्ते व प्रशासन करत असले तरी या पौराणिक महत्त्व व पावित्र्य असलेल्या सरस्वती नदीला नाकारणे म्हणजे स्वतःच्या आईला विसरणे इतपत हे पाप घडत आहे .विनंती अशी आहे की आपल्या हातामध्ये या नदीला पूर्वीचे स्वरूप आणून देता येऊ शकते. त्याचे पावित्र्य ठेवता येऊ शकते .हे सोडून त्याला नाला बनवून प्रदुषित करून त्याच्यावर अतिक्रमण करून सरस्वती नदी संपवण्याचा हा पूर्वापार चालत आलेला कट व घाट दिसत आहे. तरी कांतीपुरी व वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे महत्त्व जपणे परळीच्या व परळी पंचक्रोशीतील सर्व भाविकांचे ,नागरिकांचे आद्य कर्तव्य ठरते.

✍️ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे (संतवाड्.मयाचे संशोधक) 9421337053

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !