गोपीनाथराव मुंडेंसारखे आता ऐसे कोणी पुढे होणे नाही-रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक

लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथगडावर लोटला जनसागर !

कुटुंबापेक्षाही काकणभर अधिक प्रेम जनतेने दिले; त्याची उतराई होण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन- ना. पंकजाताई मुंडे


गोपीनाथराव मुंडेंसारखे आता ऐसे कोणी पुढे होणे नाही-रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक


परळी वैजनाथ।दिनांक ०३।

माझे पिता आणि आपले नेता लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे पुण्यात्मा होते. त्यांनी आयुष्यभर कोणाचेही वाईट चिंतले नाही. सदैव वंचितांचे वाली आणि वाणी होण्याचा त्यांनी मार्ग निवडला. त्यातूनच त्यांचे मोठेपण निर्माण झाले.आज त्यांच्या जाण्यानंतर अकरा वर्षांनीही हा विराट जनसमुदाय हेच दाखवून देतो. मुंडे साहेबांनंतर तुम्ही आम्हाला बळ दिलं. आमच्या परिवाराला शक्ती दिली. त्यामुळे कुटुंबापेक्षाही काकणभर अधिकचे प्रेम तुम्ही केलेलं आहे. त्या प्रेमातून उतराई होण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात दिली. तर गोपीनाथराव मुंडेंसारखे आता ऐसे कोणी पुढे होणे नाही असे वर्णन रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक यांनी कीर्तन प्रसंगी बोलताना केले.

     लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात बोलताना ना पंकजाताई मुंडे यांनी उपस्थितांशी आत्मीय संवाद साधला. या ठिकाणी उपस्थित प्रत्येक जण म्हणजे गोपीनाथ मुंडे परिवार असल्याचे आवर्जून सांगत हा आपल्या परिवाराचा कार्यक्रम असुन या ठिकाणी आपण दरवर्षी येऊन ऊर्जा घेतो. लाखोंचा जनसमुदाय मला सातत्याने शक्ती देतो. हे प्रेम, ही शक्ती यापुढेही अशीच माझ्या पाठीशी राहावी अशी अपेक्षा ना. पंकजाताई यांनी व्यक्त केली. गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त रामायणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन झाले. या कीर्तनानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

        तत्पूर्वी सकाळपासूनच गोपीनाथगडावर स्व. मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंडेप्रेमींनी रीघ लावली होती. त्याचबरोबर स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्ष रोपांचे वाटप, पशुसंवर्धन कॅम्प आदी उपक्रमही घेण्यात आले. या उपक्रमातही नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद घेतला. गोपीनाथ गडावर झालेल्या या कार्यक्रमाला व दर्शनाला राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणाची दृष्ट न लागो आपल्या या वैभवाला...

---------------------

     यावेळी काहीशी भावुक भावना व्यक्त करताना ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, आज अकरा वर्षे झाले माझे बाबा आणि आपले नेते आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांचे संस्कार आणि विचार पुढे घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे. त्या विचारावर वाटचाल करताना वंचितांचा वाली आणि वाणी होण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. आजच्या या क्षणी सर्व भावंडे सर्व परिवार गोपीनाथगडावर एकत्र आहे. याचा मुंडे साहेबांनाही मोठा आनंद निश्चितच होत असणार. वैभव म्हणजे गाडी, संपत्ती, पैसा हे नाही तर लाखोंचा जनसमुदाय व त्यांचे हे प्रेम हे खऱ्या अर्थाने आमच्या परिवाराचे वैभव आहे. कितीही यातना भोगण्याची वेळ आली तरी त्या जनतेच्या प्रेमासाठी आम्ही यातना भोगायला तयार आहोत.मात्र या वैभवाला कोणाची दृष्ट लागू नये असे वाटते असे पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितले.

आज मुंडे साहेब असते तर देशाच्या कारभारात मोठ्या पदावर असते

---------------------

     यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचा संदर्भ देत ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, आज मुंडे साहेब असते तर निश्चितच ते देशाच्या केंद्रस्थानी कारभारात मोठ्या पदावर असते. केंद्रातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत सदैव ते आपल्याला दिसले असते. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. त्यामुळे मुंडे साहेब आज आपल्यात नसले तरी त्यांचा वारसा, विचार आणि संस्कार आपल्या पाठीशी आहेत. त्या आशीर्वादावर निश्चितच मुंडे साहेबांना अभिप्रेत असा सामाजिक न्याय आपल्याला प्राप्त होईल असा विश्वास ना पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.


अकरा वर्षानंतरही 3 जून आली की वीज कोसळणाऱ्या त्या कटू आठवणी जाग्या होतात

----------------------

       यावेळी अकरा वर्षांपूर्वीच्या आपल्यावर कोसळलेल्या दुःखाच्या आठवणी आपल्याला आजही वीज कोसळल्याचाच अनुभव करून देतात असे सांगताना पंकजाताई मुंडे यांनी तो दुःखद प्रसंग सांगितला.अकरा वर्षांपूर्वी मुंडे साहेब आमच्यातून गेले तेव्हा खूप मोठं संकट खूप मोठी वीज आमच्या डोक्यावर कोसळली होती. दोन जूनला रात्री मुंडे साहेबांना मी शेवटचे बोलले तेव्हा ते मला सांगत होते की मला हेलिकॉप्टर पाहिजे कारण मला सत्काराला जायचंय. सत्काराला परळीला जायची सगळी तयारी झाली होती.अचानक सकाळी सहाच्या सुमारास फोन आला की बाबांचा एक्सीडेंट झाला आणि नियतीने आपलं सर्वस्वच हिरावून नेलं असा प्रसंग कोणावरच येउ नये असे ना. पंकजाताई यांनी सांगितले.


_स्व.आर.टी. देशमुखांच्या निधनाने पुन्हा तसाच दुःखद प्रसंग_ 

----------------- गोपीनाथगडावरील कार्यक्रमातही स्व.आर.टी. देशमुखांच्या निधनाचे दुःख व्यक्त करत पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, मुंडे साहेबांच्या आपघाताच्या कटू आठवणीसारखाच पुन्हा तसाच दुःखद प्रसंग स्व.आर.टी. देशमुखांच्या निधनाने आला.आर. टी. देशमुख जिजा यांचे निधन ही अतिशय दुःखद घटना झाली. आपण गोपीनाथ गडावर आवर्जून त्यांचा फोटो लावला. लेक म्हणून सूतकही पाळले. ना जात, ना पंथ ना धर्म परंतु असे असंख्य ऋणानुबंध मुंडे साहेबांनी निर्माण केलेले आहेत.मुंडे साहेबांचा हाच वारसा पुढे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


क्षणचित्रं

-------

• लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच राज्यभरातून कार्यकर्त्यांची गोपीनाथ गडावर गर्दी

• स्मृतिदिनानिमित्त गडावर आकर्षक कमान, मुंडे साहेबांचे भव्य कट आऊट तसेच त्यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

• ना. पंकजाताई मुंडे, डाॅ प्रीतमताई मुंडे, आई प्रज्ञाताई, बंधू आमदार धनंजय मुंडे, नातू आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे, काकू रूक्मिणबाई मुंडे, चुलत बंधू अजय मुंडे,अभय मुंडे, रामेश्वर मुंडे, रमेश कराड आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित 

• ना. पंकजाताईं, प्रीतमताई, प्रज्ञाताई यांचेसह धनंजय मुंडे सकाळी मुंडे साहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले.

• स्मृतिदिनानिमित्त गडावर रक्तदान शिबीर,आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने योजनांची माहिती तसेच शेळी मेंढी पालकांना औषधाचे वाटप,

• वृक्षांच्या रोपांचे तसेच कापडी पिशवीचे वाटप, गडावर 'नो प्लास्टिक' आदी उपक्रम राबविण्यात आले.

• राज्यभरातून विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार