जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम
एकल प्लास्टिकमुक्त मंत्रालय: सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा — पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप
📍 मंत्रालय, मुंबई | दिनांक: ५ जून २०२५
जागतिक पर्यावरण दिन २०२५ च्या निमित्ताने आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमाला पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,“एक दिवसापुरतं नव्हे, तर सातत्याने पर्यावरणपूरक निर्णय घेणे हीच काळाची गरज आहे. मंत्रालय एकल प्लास्टिकमुक्त व्हावे ही केवळ घोषणाच नव्हे, तर प्रत्येक कर्मचाऱ्याचा सहभाग असलेली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून यामध्ये योगदान दिले, तर हे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल.”
यावेळी मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि एकल प्लास्टिकच्या वापराच्या विरोधात संकल्प घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शासकीय यंत्रणांमध्ये पर्यावरण संवर्धनाची संस्कृती निर्माण करणे.
कार्यक्रमाला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एन. रामस्वामी, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे पर्यावरणासाठी सुरू असलेले उपक्रम जाणून घेतले व त्यांचे कौतुक केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा