प्रभू वैद्यनाथ देवस्थानाच्या इनामी जमिनीवर अतिक्रमण — पुजाऱ्यांचे बुधवारपासून उपोषण
परळी वैजनाथ (ता.११ जून २०२५) — भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र प्रभू वैद्यनाथ देवस्थानाच्या इनामी जमिनीवर अतिक्रमण होत असुन, गेल्या अनेक महिन्यांपासून या अतिक्रमणावर कारवाई न झाल्याने अखेर देवस्थानचे पुजारी मैदानात उतरले आहेत. बुधवार दि. ११ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात समस्त पुजारीवर्गाने जाहिर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात उच्च न्यायालय व अप्पर जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आदेश देऊन परळी तहसील मंडळ अधिकारी यांना संबंधित जमिनीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. प्रशासनाने या आदेशानुसार दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली असुन अतिक्रमण झाल्याचे स्पष्टपणे नोंदवले आहे. मात्र, इतका स्पष्ट अहवाल असुनही अद्याप शासन किंवा संबंधित प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
या निष्क्रियतेचा निषेध म्हणून प्रभू वैद्यनाथ देवस्थानचे सर्व पुजारी संघ एकत्र येत उपोषणाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत.
प्रमुख मागण्या:
• इनामी जमिनीवरील अतिक्रमण तत्काळ हटवावे.
• अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
• देवस्थानच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
पुजारी मंडळाचे म्हणणे आहे की, "शासनाने जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर भाविकांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल."
या उपोषणात सर्व भाविकांनी, नागरीकांनी व सामाजिक संघटनांनी सहभागी होऊन प्रभू वैद्यनाथ देवस्थानाच्या पवित्रतेसाठी व अस्तित्वासाठी साथ देण्याचे आवाहन पुजारी संघटनेकडून करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा