मानवतेचे पूजक :- समाजभूषण स्व.सुवालालजी (ललवाणी) वाकेकर

सुवालालजी वाकेकर यांच्या हळव्या आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची मोहिनी दोन दशके उलटूनही समाजमनावर आजही कोरल्या गेलेली आहे.

   खरंतर या जगात मोजकीच माणसं असतात की ज्यांचं चांगुलपण कुठल्याच मोजपट्ट्यात मोजता येत नाही, दूरवर पसरलेल्या क्षितिजासारखं त्यांचं मोठेपण हे कितीही सांगायचं म्हटलं तरी ते शब्दात मावत नाही.


  “ या काळाच्या भाळावरती

     तेजाचा तू लाव टिळा,

 आणि फुलू दे तुझ्या श्रमातून

     मानवतेचा इथे मळा”

 असा त्यांच्या कर्तुत्वाने फुललेला माणुसकीचा मळा ते आपल्यातून गेले तरी तो फुलतच राहत असतो.

       असाच आपल्या माणुसकीचा,  मळा फुलवून आपल्यातून निघून जाऊन दोन दशक झाली आहेत तरी ज्यांच्या स्मृती अवीट अन आजही ताज्या वाटतात असं बहुआयामी प्रेरणास्त्रोत आणि माणुसकीचा मूर्तीमंत झरा आणि मानवतेचे खरे पूजक म्हणजे समाजभूषण सुवालालजी (ललवाणी) वाकेकर.            

          सुवालालजींना जाऊन आज 21 वर्ष उलटली आहेत तरी त्यांच्या कार्याचा दरवळ सुगंधासारखा सर्वदूर पसरलेला आहे तो आजही स्मृती पटलावरून दूर जात नाही.

 काकाजींचे जीवन हे मानवतेसाठी समर्पित होते. 

  उच्च शिक्षण घेऊन आपले आयुष्य नोकरी किंवा व्यवसायात पूर्णपणे वाहून न घेता त्यांनी सामाजिक दायित्वाची भावना जपून आपलं सर्व आयुष्य समाजासाठीआणि  सामाजिक कार्यासाठी समर्पित केलं.        

चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय चहुकडे  सुगंधाचा दरवळ होत नसतो त्याप्रमाणे त्यांनी आपलं अख्ख  आयुष्य हे इतरांसाठी सत्कारणी लावलं, त्यासाठी काकाजींनी उद्योग व्यवसायाव्यतिरिक्त शैक्षणिक, सामाजिक व राजकीय चळवळीत आपला एक वेगळा ठसा उमटवून आपल्या कार्याची एक वेगळी छाप उमटविली आणि त्यांनी आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले.

घरंदाज, संपन्न अशा ललवाणी परिवारात सुवालालजींच्या पायाशी सुखे सुखे लोळण घेत असताना त्यांचा त्याग करून इतरांच्या भल्यासाठी ते सतत धडपडत असत.

        आजच्या स्वार्थाने बरबटलेल्या जगात सुवालालजी(ललवाणी) वाकेकर यांच्यासारखी माणसेही दुर्मिळच..!  

सुवालालजींनी आपल्या कुटुंबाला उच्चशिक्षित तर केलेच शिवाय अनेकांना उद्योग व्यवसायात मदतीचा हात दिला, अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

   परळी अन परिसरातील भावी पिढी शैक्षणिकदृष्ट्या मागासली राहू नये म्हणून त्यांनी सत्तरच्या दशकात लिटल फ्लॉवर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. यासाठी त्यांनी आपली स्वतःची जमीन दान देऊन  येथे शिक्षणाची रुजवन केली यातून त्यांचे दातृत्व आणि दानशूरपणा प्रत्ययास येतो..

 याशिवाय परळीतील नामांकित असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून शैक्षणिक दृष्ट्या सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते नेहमीच क्रियाशील राहिले. 

मराठवाड्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातही त्यांनी सचिव म्हणून आपले भरीव योगदान दिले .

    राजकीय क्षेत्रातील आपल्या कार्य कौशल्याने त्यांनी परळीचे उपनगराध्यक्ष व काही काळ  नगराध्यक्ष म्हणून  आपला एक वेगळा ठसा उमटविला.

     काँग्रेस पक्षाची वैचारिक बांधिलकी जोपासताना सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांनी जीवाभावाचे स्नेह संबंध जपले आणि ते त्यांनी शेवटपर्यंत टिकवले.

     साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीतही त्यांचे योगदान अनन्यसाधारण असे राहिले होते.

मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेचा त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा आजही परळीकरांसाठी सुवर्णकाळ मानला जातो.

साहित्य आणि शैक्षणिक योगदानामुळे त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एक्झिटिव्ह कौन्सिल सदस्य आणि सिनेटचे सदस्य म्हणूनही त्यांची वर्णी लागली, त्यांनी तिथेही आपल्या कार्याची एक वेगळी ओळख निर्माण केली.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या सामाजिक कार्यालाही झळाळी प्राप्त करून दिली म्हणूनच त्यांना जैन श्रावक संघाचे अध्यक्ष आणि भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी मध्ये त्यांना स्थान मिळाले.

एकंदरच सुवालालजींनी सामाजिक व राजकीय चळवळीत काम करत असताना ‘मानवता’ ही केंद्रस्थानी ठेवून कार्य केले , म्हणून त्यांच्या कार्याला सोन्यासारखी झळाळी प्राप्त झाली.

 नम्र, विनयशील, चारित्र्यसंपन्न मानवतेचा पूजक, सकारात्मक मनोवृत्ती असणारा उदारमतवादी, सामाजिक दृष्टी असणारा आशावादी, स्नेहसंबंध जपणारा हितचिंतक, सहकार्याची भावना ठेवणारा मित्र, अनेक जबाबदाऱ्या पेलून पतीधर्म निभावणारा प्रेमळ पती, आपल्या कुटुंबाची जडणघडण करणारा कुटुंबवत्सल पिता, आणि  माणुसकीचा मूर्तीमंत झरा अशा कितीतरी बिरूदावली काकाजींना लावल्या तरी त्या कमीच आहेत. 

       आज त्यांच्या स्मृतिदिनी मागे वळून पाहताना त्यांच्या अनंत स्मृती अगदी तरलपणे स्मृती पटलावर जाग्या होतात.

“करून जावे असेही काही

 दुनियेतून या जाताना

 गहिवर यावा जगास साऱ्या

 निरोप शेवट देताना...!

  या काव्यपंक्तीप्रमाणे काकाजींच्या पावन स्मृतींनी अंतकरण आजही गहिवरून येते , पण शेवटी नियतीच्या हाती सर्व जगाचा पसारा असल्याने 

“गेले त्यांना आता

 कुणी कसे गावे,

 पुन्हा उगवावे

 जोमदार” 

याप्रमाणे सुवालालजींच्या पश्चात (ललवाणी) वाकेकर परिवारावर आपल्या मातृत्वाची सावली देणाऱ्या चंचलदेवी, काकाजींच्या पश्चात सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा चालवणारे तसेच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा  खांद्यावर घेणारे  विजयजी वाकेकर ,डॉ. प्रकाश वाकेकर, दीपक वाकेकर आणि मुलगी दिपाली जैन व संपूर्ण (ललवाणी) वाकेकर परिवार  काकाजींनी जपलेल्या माणुसकीच्या, बहुआयामी कार्याचा वसा आणि वारसा पुढे नेत आहेत हेच त्यांचे खरे पुण्यस्मरण आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली.

✍️अनंत मुंडे 

कार्याध्यक्ष:- मराठवाडा साहित्य परिषद, परळी वैजनाथ

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !