मंत्रालयातील महत्त्वपूर्ण बैठकीत निर्देश....
परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीची होणार आधुनिकतेकडे वाटचाल – नवीन जागेचा विकास, केंद्र शासनाच्या योजनांमधून साहाय्याची हमी
मुंबई.......
परळी वैजनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) नवीन जागेचा विकास करून तेथे अत्याधुनिक बाजार समिती उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, या विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून अल्प व्याज दरात कर्ज, तसेच केंद्र शासनाच्या योजनांचे साहाय्य उपलब्ध करून द्यावे. या प्रस्तावाला अंतिम रूप देऊन पणन मंडळाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री जयकुमार रावल होते. यावेळी माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे, राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे, पणन संचालक विकास रसाळ, मार्कफेडचे व्यवस्थापक महेंद्र ढेकळे, तसेच परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव उपस्थित होते.
काय होणार नवीन प्रकल्पांतर्गत?
- परळी वैजनाथ APMC च्या नव्या जागेचा वापर करून आधुनिक बाजार समितीचे बांधकाम केले जाईल.
- या ठिकाणी सुसज्ज गाळे, थंड साठवणूक केंद्रे, डिजिटल लिलाव प्रणाली, वाहतुकीची सुविधा, आणि शेतकऱ्यांसाठी सुविधा केंद्र विकसित केली जाणार आहेत.
- बाजार समितीच्या आधुनिकीकरणामुळे शेतकऱ्यांना चांगला दर, आधुनिक सोयी, आणि बाजारातील पारदर्शकता मिळणार आहे.
केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त प्रयत्न
या विकास योजनेत केंद्र शासनाच्या कृषी पणनविषयक योजनांमधून निधी, तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांतील तांत्रिक व आर्थिक सहाय्य घेण्याची दिशा बैठकीत ठरवण्यात आली.
परळी ही मराठवाड्यातील एक समृद्ध बाजार समिती असून, या बाजार समितीच्या विकास आणि शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण व अत्यंत सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह माजी आ. संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे, सचिव बलवीर रामदासी यांसह संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा